विद्यापीठाकडून जनमाहिती अधिकाऱ्यांची नेमणूक

अर्जदारांना वेळेत माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा

पुणे – राज्यपाल कार्यालयाने माहिती अधिकार कायद्यानुसार जनमाहिती अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठाने जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यामुळे आता अर्जदारांना वेळेत माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकार कायद्यानुसार विभागनिहाय जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे आवश्‍यक होते. मात्र पुणे विद्यापीठामध्ये केवळ दोनच जनमाहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अर्जदारांना माहिती मिळण्यात अडचणी येत होत्या. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. एस. एस. जाधव यांनी राज्यपाल कार्यालयाकडे तक्रार केली होती. कुलगुरूंनी या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यपाल कार्यालयाकडून नुकतेच देण्यात आले होते. यापार्श्वभुमीवर जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी सोमवारी काढले.

कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, प्रशासन शिक्षक कक्ष आदी विविध विभागांमधील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, सर्व विभागांचे विभागप्रमुख, संचालक, कार्यक्रम समन्वयक आदी जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचे परिपत्रक काढण्यात आले आहे. या अधिकारी, विभागप्रमुखांच्या विभागांशी संबंधित प्रकरणांसाठी त्यांना जनमाहिती अधिकारी समजले जाईल. त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करून घेऊन विद्यापीठाच्या माहिती अधिकारी कार्यालयातील जनमाहिती अधिकाऱ्यांकडून संबंधित अर्जदारास पुरवण्यात येईल, असे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)