जाहीरनामा बनवण्यासाठी भाजप घेणार जनतेची मदत

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा बनवताना भाजप जनतेची मदत घेणार आहे. भाजपच्या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे.

संकल्पपत्र बनवण्यासाठी देशातील 10 कोटी नागरिकांपर्यंत पोहण्याचे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. संकल्पपत्रासाठी जनतेकडून सूचना स्वीकारण्याच्या मोहिमेचा रविवारी येथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. पहिली सूचना देण्यासाठी पक्षाने एका हॉटेलमधील वेटरची निवड केली. भाजपच्या या मोहिमेला भारत के मन की बात, मोदी के साथ असे नाव देण्यात आले आहे.

जनतेच्या सूचना स्वीकारण्यासाठी भाजप देशभरात 300 हून अधिक वाहनांची आणि 7 हजार 700 सूचनापेट्यांची व्यवस्था करणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेवेळी जनतेशी दूरध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संपर्क साधला जाणार आहे. दरम्यान, जाहीरनामा बनवण्याच्या प्रक्रियेचे लोकशाहीकरण करण्याचा आमचा उद्देश आहे. या अनोख्या प्रयोगामुळे लोकशाही मजबूत होण्यास हातभार लागेल.

जनतेला काय हवे ते आम्हाला समजेल. नवभारताचे स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी त्यातून आम्हाला मदत होईल, असे शहा नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. देशात याआधी एखाद्या पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी एवढी मोठी मोहीम कधीच हाती घेण्यात आली नव्हती, असे राजनाथ यांनी नमूद केले. भाजपच्या जाहीरनामा समितीचे राजनाथ हे अध्यक्ष आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)