पालिकेच्या सायकल्स ज्येष्ठांसाठी दूरच

तोडगा सापडेना : मोबाइल अॅॅप वापरता येत नसल्याने अडचण

पुणे – खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा तसेच पर्यावरण जोपासले जाण्यासाठी महापालिकेने सुरू केलेली पब्लिक बायसिकल योजना ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गासाठी दूरच असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला या सायकल्स वापरण्यासाठी आवश्‍यक असलेले मोबाइल अॅॅप वापरता येत नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यावर तोडगा काढण्यासाठी या सायकल पुरविणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करण्यात आली असली, तरी अजून तोडगा काढता आला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडून शहरात पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत शहरात पुणेकरांसाठी तब्बल 1 लाख सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने चार कंपन्यांशी करार केला आहे. त्यांनी गेल्या सहा महिन्यात सुमारे 4 हजार सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या वापरण्यासाठी संबधित व्यक्‍तीला मोबाइल अॅॅप डाउनलोड करावे लागते. त्यानंतर हे अॅॅप आपल्या ई-वॉलेटला अथवा बॅंक खात्याला जोडावे लागते. त्यानंतर सायकल वापरल्या संबंधितांच्या खात्यातून सायकलचे युजर चार्जेस थेट कंपनीच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे या सायकल वापरायच्या असल्यास स्मार्टफोन बंधनकारक आहे.

महापालिकेने या सायकल प्रामुख्याने शहरातील प्रमुख उद्याने तसेच सकाळी ज्या भागात नागरिक फिरण्यासाठी येतात, त्या भागात ठेवल्या आहेत. तर, शहरात या भागात ज्येष्ठ नागरिक “मॉर्निंग वॉक’साठी येतात. मात्र, मोबाइल अॅॅप वरून आर्थिक फसवणूक होत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक अनोळखी अॅॅप वापरत नाहीत, तर स्मार्टफोन वापरणे कठीण जात असल्याने अनेकजण साधे फोन वापरतात. अशीच स्थिती शहरातील कामगार वर्गाचीही आहे. त्यांनाही या सायकल वापरायच्या आहेत, मात्र त्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत. ही बाब निदर्शनास आणल्यानंतर महापालिकेने सायकल कंपन्यांशी चर्चा केली आहे.

मी दररोज सकाळी पु.ल. देशपांडे उद्यानात फिरण्यासाठी येतो. माझे घर येथून अडीच किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून मी गाडी घेऊन येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून माझ्या घराच्या परिसरात पालिकेच्या सायकल ठेवल्या आहेत. स्मार्टफोन वापरण्यात मला अडचणी येत असल्याने या सायकल वापरता येत नाहीत.
– “मॉर्निंग वॉक’साठी येणारे ज्येष्ठ नागरिक.

आम्हाला कामावर जाण्यासाठी बस, नाहीतर रिक्षाचा वापर करावा लागतो. त्या तुलनेत सायकल स्वस्त दरात आहेत. पण, आमच्याकडे त्यासाठीचे मोबाईल नाहीत. तसेच ते आम्हाला वापरताही येत नाहीत. त्यामुळे आम्हाला रिक्षालाच पैसे द्यावे लागतात.
– रामकुमार जाधव, बांधकाम मजूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)