मुंबईची तुंबई होण्याला सर्वाधिक जबाबदार प्लॅस्टिक आहे असे म्हटले जाते. मुंबईतील ड्रेनेज सिस्टिम ही केवळ प्लॅस्टिकने पॅक झाली आणि पाण्याचा निचरा न झाल्याने सगळे चेंबर, ड्रेनेज तुंबले आणि मुंबई “जलमय’ झाली. अर्थात ही घटना काही वर्षांपूर्वीची असली, तरी मुंबई काय आणि पुणे काय, अजूनही तेथे पावसात वेगळी परिस्थिती होत नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असे पाणी साचल्यामुळे जी ड्रेनेजची झाकणे उघडली जातात, त्यात अनेक पादचाऱ्यांचा हकनाक बळी गेलेला दिसून येतो. एका प्रख्यात डॉक्टरचा असा मृत्यू यामध्ये झाला आहे. या सगळ्याला प्लॅस्टिक आणि त्याचा अतिवापर हेच कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल.
प्लॅस्टिक प्रदूषणाबाबत गेल्या अनेकवर्षांपासून विचारमंथन सुरू आहे. या प्लॅस्टिकचे करायचे काय, यावर अनेक उपाय अनेक तज्ज्ञांकडून सुचवले जात आहे. प्लॅस्टिक निर्मितीच झाली नाही तर हा प्रश्न सुटतो, हे खरे आहे परंतु प्लॅस्टिक हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झाले आहे. अगदी प्लॅस्टिकच्या पिनेपासून ते मोठ्यामोठ्या वस्तूच या प्लॅस्टिकपासून आता बनवल्या जातात. त्यामुळे आता या प्लॅस्टिक निर्मितीला “रिव्हर्स ब्रेक’ नाहीत हेच म्हणावे लागेल. शक्य तिथे प्लॅस्टिक वापरू नये यासाठी जनजागृती केली जाऊ शकते. यामध्ये शाळा महाविद्यालयीन स्तरावर, आपल्या घरापासून ही सुरूवात केली जाऊ शकते.
शाळास्तरावर केली जातेय जागृती
आता शाळास्तरापासूनच जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक शाळांमध्ये घरून प्लॅस्टिक घेऊन या आणि येथे संकलित करून ते गोळा करून स्वयंसेवी संस्था घेऊन जातात. यामध्ये अगदी दुधाच्या पिशव्यांपासून ते प्लॅस्टिक खेळणी या सगळ्यांची मागणी करण्यात येते. त्यामुळे संस्कारक्षम वयातच मुलांवर जर या प्रदूषणाविषयी समजले तर ते घरीही त्याचा आग्रह धरू शकतात हा त्यामागचा उद्देश्य आहे.
प्लॅस्टिक भरलेल्या बॉटल्स
आपल्या घरात असलेल्या मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये आपण रोज जमा होणारे प्लॅस्टिक भरू शकतो. त्या बाटल्या भरल्या की त्या कचरा वेचकांकडे देऊ शकतो. याचा उपयोग काय, हा उद्योग कशाला असा प्रश्न अनेकांना पडला असेल, परंतु या बाटल्यांमध्ये हे प्लॅस्टिक भरल्यास ते अन्यत्र कोठेही वाहात जाणार नाही, कोणत्या जाळ्यांमध्ये अडकणार नाही आणि पाण्याचा प्रवाह अडवला जाणार नाही. शिवाय कोणत्याही मुक्या प्राण्याच्या पोटात जाणार नाही. एवढे केल्यास आपण वरील परिणाम टाळून आपला खारीचा वाटा यामध्ये उचलू शकतो. आवश्यक आणि नाईलाज असेल तेव्हाच प्लॅस्टिकचा वापर करावा अन्यथा, कापडी पिशव्यांचा वापर करणे अत्युत्तम आहे.