बंदी घातल्यामुळे व्यसनाधीन मुलांचे पालक मात्र खूश
नवी दिल्ली – केंद्र सरकारने तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय असलेल्या पब्जीवर बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाइलवर हा खेळ खेळत राहण्याचे व्यसन जडलेले तरुण हैराण झाले आहेत. जिंदगी बरबाद हो गयी, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. तर अशा युवकांचे पालक मात्र खूश झाले आहेत. असा सोन्याचा दिवस आमच्या जीवनात येईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र, तो आला आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
भारतात तब्बल 3 कोटी 30 लाख तरुण पब्जी हा गेम मोबाइल किंवा संगणकावर खेळण्यात कायम दंग असतात. हा खेळ चालू असताना त्यांना कसलेही भान राहात नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांना त्यांना आवरता आवरता नाकीनऊ येते. “मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पालकांच्या या अडचणींचा उल्लेख केला होता.
आता सरकारने लोकांच्या खासगी जीवनावर आणि देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम करणारे हे ऍप आहे असे सांगून यावर कालपासून बंदी घातली आहे. अशा तरुणांनी इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर निराशाजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही तरुणांनी म्हटले आहे की, हा खेळ खेळायला मिळत नसल्यामुळे आता तांडव नृत्य करणार आहोत. पब्जी बंद झाले ही कल्पना पचविणे फारच अवघड जात आहे, असे काही तरुणांनी म्हटले आहे. अगोदर टिक-टॉक बंद झाले. आता पब्जी बंद झाले. हे दुःख कधी संपेल अशा निराशाजनक प्रतिक्रिया काही तरुणांनी व्यक्त केल्या आहेत. तरुणातील संवादातही या विषयावर सध्या जोरदार चर्चा चालू आहे.
मात्र, ज्यांना पब्जीचे आकर्षण नाही असे तरुण अशाच मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करून सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. विशेषतः पालकवर्गात आनंदी आनंद पसरला आहे. काही पालकांनी हिंदी चित्रपटातील देवासमोर प्रार्थना करीत असल्याचे दृश्य टाकून त्याला अखेर सोन्याचा तो दिवस उजाडला असे म्हटले आहे. काही पालकांनी केंद्र सरकारला आमच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला असल्याचे म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षकांकडून आनंद
विशेषत: शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना पब्जी बंद झाल्यामुळे प्रचंड आनंद झाला आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष नसण्याचे कारण पब्जी आणि टिक-टॉक असल्याचे या शिक्षकांना माहीत झाले होते. आता कर्मधर्मसंयोगाने या दोन्हींवर बंदी झाल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्यास मदत होणार आहे. त्याबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.