मैदानी स्पर्धेत पी.यु. चित्राची सोनेरी कामगिरी

नवी दिल्ली – भारताच्या पी.यु. चित्रा हिने स्वीडनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेतील 1500 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर 4 मिनिटे 12.65 सेकंदात पार केले.

चित्रा हिने या स्पर्धेत केनियाच्या मर्सी चेरोनो हिच्यावर विजय मिळविला. मर्सी हिने 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाच हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत विजेतेपद मिळविले होते. चित्रा हिने दोहा येथे एप्रिलमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत 1500 मीटर्स धावण्याच्या शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले होते.

स्वीडनमधील स्पर्धेत आशियाई क्रीडा स्पर्धा विजेता खेळाडू जिन्सन जॉन्सन याला 1500 मीटर्स शर्यतीत रौप्यपदक मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास 3 मिनिटे 39.69 सेकंद वेळ लागला. त्याने नेदरलॅंड्‌समध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत याच शर्यतीत 3 मिनिटे 37.62 सेकंद वेळ नोंदवित राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

कोपनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर याने लांब उडीत सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पहिल्या प्रयत्नात 7.93 मीटर्सपर्यंत उडी मारली. नंतरच्या टप्प्यात त्याने 7.89 मी., 7.88 मी, 7.61 मी. अशी कामगिरी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.