इस्लामाबाद – पाकिस्तानात गेल्या वर्षी ८ फेब्रुवारीला झालेल्या बेकायदेशीर निवडणुकांच्या स्मरणार्थ माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाच्यावतीने आज काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान पीटीआयच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. पीटीआयचे सरकार असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी स्वाबी येथे पीटीआयने आपली मुख्य रॅली काढली. पीटीआयच्या समर्थकांना आणि आंदोलकांना देशभर आंदोलन करण्याचे आवाहन देखील पक्षाच्यावतीने करण्यात आले.
तत्पूर्वी, पक्षाने लाहोरमधील ऐतिहासिक मिनार-ए-पाकिस्तान येथे रॅलीचे नियोजन केले होते. मात्र पंजाब प्रांताच्या अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यामुळे ही योजना रद्द करावी लागली. मरियम नवाज यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने ८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण प्रांतात कलम १४४ लागू केले, सर्व राजकीय संमेलने, मेळावे, धरणे, रॅली, निदर्शने, निषेध आणि इतर अशा एकत्रीकरणांवर बंदी घातली गेली. पीटीआय कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी येण्यापासून रोखण्यासाठी घटनास्थळी आणि परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गटागटाने आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
शनिवारी मुलतान शहरात अटक करण्यात आलेल्या पक्षाच्या डझनभर कार्यकर्त्यांमध्ये पीटीआयचे तुरुंगात असलेले उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांची कन्या मेहर बानो कुरेशी यांचा देखील समावेश आहे. कुरेशी यांनी आणि पीटीआयच्या अन्य कार्यकर्त्यांनी चोरीच्या आदेशाद्वारे स्थापित केलेल्या कठपुतळी सरकार विरोधात निदर्शने केली.
तथापि सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाने लाहोरमध्ये जमावबंदीचे उल्लंघन केले आणि आपल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रॅली काढली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला होता. केंद्रीय माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी या सभेला संबोधित केले.
सरकारने निवडणुकीचा निकाल चोरण्यासाठी वेगवेगळे डावपेच वापरले आणि पीटीआयचे विरोधक जे पराभूत होत होते, त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते, असे पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते मलिक अहमद खान भाचर म्हणाले. तर लोकांच्या जनादेशाची ऐतिहासिक चोरी केल्याच्या निषेधार्थ काळा दिवस साजरा केला जात आहे, असे खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर म्हणाले.
दरम्यान, मुझफ्फराबादमध्ये आझादी चौकात आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीटीआयच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा दलांनी निदर्शकांवर कारवाई केल्याने काही मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. तेथे पीटीआयच्या १६ नेत्यांना अटक झाली. बलुचिस्तानमद्येही १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांना पुन्हा एकदा चर्चेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र इम्रान खान यांनी सरकारचे हे आवाहन फेटाळले आहे.