Imran Khan – इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने नव्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पानिपतच्या युद्धाप्रमाणे आम्ही हल्ले करतच राहू. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच असेल, असे खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमिन गंदापूर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आतापर्यंत आम्ही केवळ पाचवेळा आंदोलन केले आहे. शेवटपर्यंत आमचे आंदोलन सुरूच असेल, असे गंदापूर म्हणाले. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी दिनांक २४ नोव्हेंबर रोजी पीटीआयने इस्लामाबादेत केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने ते बोलत होते.
इम्रान खान यांनी केलेल्या आवाहनानुसार पीटीआयच्या हजारो कार्यकर्त्यांनी २१ नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये विराट मोर्चा काढला होता. गंदापूर आणि इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते.
मात्र पोलीस आणि सुरक्षा दलांनी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कठोरपणे बळाचा वापर करण्याची तयारी केली, तेंव्हा गंदापूर आणि बुशरा बिबी अचानक गायब झाले होते.
दोनच दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी सरकारविरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ करण्याचा इशारा दिला होता. तसेच आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही केली होती. पोलीसांच्या कारवाईदरम्यान पीटीआयचे १२ कार्यकर्ते ठार झाले होते. तर १०७ जण अजूनही बेपत्ता आहेत.