PT Usha-Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवणे ऑलिम्पिक संपल्यानंतरही चर्चेत राहिले आहे. तिला या श्रेणीसाठी 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आले. आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनी या मुद्द्यावर मोठे विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, “वजन नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकाची असते. यासाठी वैद्यकीय पथकाला दोष देणे योग्य नाही.”
विनेशने तिला रौप्य पदक देण्यासाठी सीएएसकडे ( CAS : Court of Arbitration of Sport) याचिकेव्दारे आवाहन केले आहे. तिचा खटला सध्या सीएएस (CAS) मध्ये असून त्यावर 13 ऑगस्टला निकाल दिला जाणार आहे. विनेशच्या याचिकेचा निर्णय येण्यापूर्वी उषा यांनी केलेल्या विधानाने नवी चर्चा रंगू लागली आहे.
त्याचवेळी अंतिम फेरीपूर्वी बाहेर पडल्यानंतर विनेशने सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर केली होती. महिला कुस्तीपटूच्या अपात्रतेनंतर, सोशल मीडियावरील एक विभाग आयओएच्या (IOA) वैद्यकीय संघावर, विशेषत: डॉ. दिनशॉ पारदीवाला आणि त्यांच्या टीमवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहे.
आता आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी या विषयावर उघडपणे भाष्य केले आहे. त्या म्हणाला की, “कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो यांसारख्या खेळांमधील खेळाडूंच्या वजन व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकाची असते. आयओएचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारदीवाला आणि त्यांच्या टीमची नाही. आयओए वैद्यकीय संघ, विशेषत: “डॉ. पार्डीवाला यांच्या विरुद्ध द्वेष अस्वीकार्य आहे, आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व तथ्यांचा विचार करू.”
पीटी उषा यांनी पुढे स्पष्ट केले की, “बहुतेक खेळाडूंचा स्वतःचा सपोर्ट स्टाफ असतो आणि आयओए-नियुक्त वैद्यकीय टीम जी पॅरिस गेम्सच्या काही महिन्यांपूर्वी तयार केली गेली होती, तीचे काम फक्त खेळाडूंना दुखापतीतून बरे करण्यासाठी आणि दुखापतींचे व्यवस्थापन करण्यात मदत करण्याचे होते.”
पीटी उषा पुढे म्हणाल्या की, ‘पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक भारतीय खेळाडूला अशा खेळांमध्ये स्वतःची सपोर्ट टीम होती. हे संघ अनेक वर्षांपासून खेळाडूंसोबत काम करत आहेत. आयओएने काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय पथक नियुक्त केले होते, जे स्पर्धेदरम्यान आणि नंतर खेळाडूंच्या पुनर्प्राप्ती आणि दुखापतींच्या व्यवस्थापनास मदत करेल. ज्या खेळाडूंकडे पोषणतज्ञ आणि फिजिओथेरपिस्टची स्वतःची टीम नाही अशा खेळाडूंना मदत करण्यासाठीही ही टीम तयार करण्यात आली होती.
दरम्यान, विनेशच्या जागी उपांत्य फेरीत तिच्याकडून पराभूत झालेली क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझ हिला अंतिम फेरीत संधी मिळाली होती. भारतीय कुस्तीपटूने आपल्या आवाहनात लोपेझसोबत संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे कारण मंगळवारी झालेल्या सामन्यांदरम्यान (उपांत्यपूर्वी) तिचे वजन निर्धारित मर्यादेत होते.