मानसोपचार : निकालाचा ताण…

“कौ स्तुभ अरे उठ 4.00 वाजले बघ. गजर बंद कर आणि ऊठ लवकर. फ्रेश हो मी गरम गरम चहा देते तो घे आणि बस अभ्यासाला. चल ऊठ पटकन.” आई कौस्तुभला उठवत होती. “”आई झोपू देना गं रोज रोज उठतोच ना. आज झोपू दे. प्लीज गं.’ “मुळीच नाही ऊठ पटकन. बाबा चिडतील हं परत.’

कौस्तुभ 12वी मध्ये होता. त्यामुळे रोज पहाटे 4.00 वाजता त्यांच्या घरी हे संवाद घडायचे. आई-बाबा काही झालं तरी त्याला पहाटे 4.00 वाजता उठायलाच लावायचे. बिचारा कौस्तुभ या 12 वीला अगदी कंटाळून गेला होता, पण त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. वडिलांचा स्वभाव खूपच कडक असल्याने तो बिचारा ते सांगतील तसंच सगळं करायचा. वडिलांनी त्याचं खेळण, टी.व्ही. पाहणं, पुस्तक वाचणं, सगळं-सगळं बंद करून टाकलं होतं. फक्त अभ्यास एके अभ्यास. कौस्तुभ अगदी कंटाळून गेला होता. त्याने हे 12 वीचं वर्ष कसं-बसं पूर्ण केलं आणि परीक्षा दिली. त्याला सगळे पेपर छान गेले. कारण तो मुळातच खूप हुशार होता. निकालाची तारीख कळली आणि कौस्तुभ बेचैन झाला.

निकालाच्या आदल्या दिवशीच आई-बाबा उठले तेव्हा त्यांनी पाहिलं की, कौस्तुभने स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं होतं. त्या रात्री त्याने “आत्महत्या’ केली होती. आई-बाबांसाठी हा खूप मोठा धक्काच होता. “निकालाची भीती वाटून मी आत्महत्या करतोय,’ अशा आशयाचं पत्र त्याने मृत्युपूर्वी लिहून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी निकाल लागला तेव्हा कळलं की कौस्तुभला सगळ्याच विषयात अतिशय उत्तम गुण मिळाले होते. पण दुर्दैवाने ते पहायला कौस्तुभ नव्हता.

पालक मित्र-मैत्रिणींनो, अशा अनेक आत्महत्यांबाबत तुम्ही वृत्तपत्रात वाचलं असेल. हो ना? अशा अनेक मुलांनी केवळ मार्कांचा ताण घेऊन आत्महत्या केल्या आहेत. अजूनही करत आहेत. काय असेल कौस्तुभच्या आत्महत्या करण्यामागचं कारण? काय चाललं असेल त्याच्या मनात? कौस्तुभच्या आत्महत्येमागे तशी बरीच कारणं आहेत. पण मुख्य कारण म्हणजे त्याच्यावर लादला गेलेला अती ताण.

अपेक्षांचं, अभ्यासाचं लादलं गेलेलं अती ओझं, ज्याने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. खरं तर कौस्तुभ हुशार होता, पण तरीही त्याच्यावर 12वी, परीक्षा, निकाल याचं अती ओझं घरच्यांकडून लादलं गेलं. इतकं की त्याचं खेळ, वाचन सगळंच बंद केलं गेलं. ज्यातून त्याला नैराश्‍य येत गेलं. आणि याच नैराश्‍यात त्यानं आत्महत्या केली. कारण मार्क कमी मिळाले तर आई-बाबा चिडतील ही भीती त्याच्या मनावर नकळत बिंबवली गेली. त्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास डळमळीत होत गेला.

एक पालक, एक समुपदेशक म्हणून असं विचारावंसं वाटतं की, पालक मित्रांनो, 10वी, 12वी म्हणजे आयुष्यातली शेवटची परीक्षा का? मान्य आहे की मार्कांवर कॉलेज, शाखानिवड हे अवलंबून असतं. पण ते आपल्या मुलाच्या जीवापेक्षा मोठं असतं? नक्कीच नाही!

तरीही खुपदा असं पाहायला मिळतं की मुलं 10वी, 12वी मध्ये गेली की घरातलं वातावरण बदलतं. घरात एक प्रकारचं गंभीर, भीतीदायक वातावरण निर्माण होतं. यातला निम्म्याहून अधिक ताण पालकांचाच असतो. या ताणातून मुलांवर नको तितकी बंधनं घातली जातात. सतत अभ्यास, अभ्यास आणि फक्त अभ्यासच असं काहीसं पालकांकडून वागलं जातं आणि मग मुलं या सगळ्यात भरडली जातात. त्यातूनच एखादा कौस्तुभसारखा मुलगा आपलं आयुष्य कायमचं संपवतो.
पालकहो, हे नक्की मान्य आहे की, सध्याचं युग स्पर्धेचं आहे. त्यात टिकायचं असेल तर कष्टांना पर्याय नाही. पण म्हणून…

  • मुलांवर खरंच इतका ताण द्यायची गरज आहे?
  • या परीक्षतले गुण म्हणजेच तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता का?
  • मार्क म्हणजेच तुमचं मूल का?

नाही फक्त हे मार्क म्हणजेच आयुष्य नाही. तुमच्या मुलांना देखील स्वतःचे विचार, मतं, इच्छा, स्वप्नं आहेत. त्याबद्दल तुम्ही कधी त्यांच्याशी मोकळेपणाने बोललात का? त्याला भविष्यात काय करायचंय हे एक सुजाण पालक म्हणून जाणून घेतलंय का? की फक्त आपल्या इच्छा, अपेक्षा त्यांच्यावर लादल्या जातायत. याचा विचार करायलाच हवा. त्यांचे मित्र-मैत्रिण बनून हे जाणून घ्यायला हवं.

पालक हो, तुमच्या मुलांची स्वप्न त्यांना पाहू दे, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रयत्न करू देत. तुम्ही त्यांचे मदतगार व्हा. हुकूमशहा नाही. त्यांची स्वप्नं पूर्ण करायला मदत केलीत तर ते नक्कीच खुलतील त्यासाठी धडपड करतील आणि त्यांची ती स्वप्नं पूर्ण करतील. स्वप्नं पूर्ण झाल्याचं समाधान त्यांनाही मिळेल आणि तुम्हालाही. जर आपण हुकूमशहा झालो तर न जाणो आपला मुलगाही कौस्तुभसारखं पाऊल उचलेल. त्यापेक्षा त्यांचे मित्र होऊन त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यास काय हरकत आहे?
– मानसी तांबे-चांदोरीकर

Leave A Reply

Your email address will not be published.