पुणे – पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुन्या निकषानुसारच ही चाचणी घेण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या म्हणजेच 2018मध्ये निश्चित केलेल्या निकषांनुसारच शारीरिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पीएसआय पदासाठीच्या शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी (किमान 60 टक्के गुण) करण्याचा निर्णय 2021मध्ये घेतला होता. तसेच हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या निर्णयाला स्पर्धा परीक्षार्थीकडून विरोध करण्यात येत होता. पूर्वीच्या निकषानुसार शारीरिक चाचणी परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांकडून होत होती. त्यासाठी निवेदनेही देण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती “एमपीएससी’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, मुख्य परीक्षेसाठी पात्रता उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले.