पॅरिस :- स्टार फुटबॉलपटू नेयमार याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर पीएसजी संघाने फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेचे विक्रमी 13 व्या विजेतेपदाला गवसणी घातली.
करोनाचा धोका फ्रान्समध्ये आटोक्यात आल्याने या स्पर्धेसाठी निवडक प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. या सामन्यात नेयमार पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाकडून खेळत होता. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याने 14 व्या मिनिटाला केलेला गोलच निर्णायक ठरला. त्याच्या कामगिरीच्या जोरावर पीएसजीने सेंट इटिनी संघाला 1-0 असे पराभूत केले.
पीएसजीचे हे या स्पर्धेच्या इतिहासातील 13 वे विक्रमी विजेतेपद ठरले. नेयमारने इटिनी संघाचा बचाव भेदण्यात यश मिळवले व नंतरच्या उर्वरित खेळात त्यांचे आक्रमण थोपवून एकही गोल करण्याची संधी इटिनीला दिली नाही.