जामखेड -नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महामार्गाच्या आढळगाव ते जामखेड या 62.775 किमी दुपदरीकरण कामाची ई-निविदा नुकतीच जाहीर झाली आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
आ. पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वीच नगर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामात येणारे अडथळे दूर करून या महामार्गाला मंजुरी मिळवली होती. आता श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गाची ई-निविदा निघाली आहे. केवळ पंधरा दिवसांतच दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची निविदा निघाल्याने मतदारसंघासाठीच नव्हे, तर इतर महामार्ग विकासाची नवी दिशा देणारे ठरणार आहेत. या नवीन महामार्गांमुळे दळणवळणाची सुविधा वाढण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत आ. पवार यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच मतदारसंघाला हे फलित मिळाले आहे. श्रीगोंदा- जामखेड महामार्ग 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. रस्ता झाल्यापासून 10 वर्षे त्याच्या डागडुजीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पुढील काळात या महामार्गांमुळे मोठा कायापालट होईल, असा विश्वास आ. पवार यांनी व्यक्त केला. या कामासाठी खा. डॉ. सुजय विखे यांचेही प्रयत्न सुरू होते.
राष्ट्रीय महामार्गांचे उजळले भाग्य!
आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले असले, तरी ते मतदारसंघापुरते सीमित राहिले नाहीत. राज्य पातळीवरचे अनेक प्रश्न या वर्षात मार्गी लावण्यात त्यांना यश मिळाले आहे.सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गांचेही भाग्य त्यांच्यामुळे उजळले आहे.