“पीएफ’ रक्कम जमा होण्याच्या कालावधीत घट

आपत्ती काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या नोकरदारांना दिलासा

पुणे – आपत्तीच्या घटना, मुलामुलींची शिक्षणे अथवा आजारपण यासाठी नोकरदारांना भविष्य निर्वाह निधी तातडीचा मदतीचा हात देणार आहे. यासंदर्भात संबंधित कार्यालयाकडे योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल केल्यास संबंधित नोकरदारांच्या खात्यात अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये ही रक्कम जमा होणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नोकरदारांना दिलासा मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेवानिवृत्ती काळात नोकरदारांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने भविष्य निर्वाह निधीची तरतूद केली आहे. हा नियम खासगी कंपन्या, खासगी ठेकेदार, शासकीय आणि निमशासकीय कंपन्यांसाठीही लागू आहे. याचे पालन न करणाऱ्या कंपन्या अथवा शासकीय कार्यालयांवर दंडात्मक कारवाईची तरतूद या नियमाद्वारे करण्यात आली आहे. मात्र, एखाद्या नोकरदाराने हा भविष्य निर्वाह निधी कापून घेण्यास नकार दिल्यास आणि तसे त्याने लेखी दिल्यास त्याला या नियमातून वगळण्याची तरतूदही यामध्ये आहे. त्यानुसार संबंधित नोकरदाराच्या पगारातून ही रक्कम कापून घेण्यात येते. त्याशिवाय तेवढीच रक्कम संबंधित कंपनीने टाकणे बंधनकारक आहे. संबंधित कामगाराचा पगार झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत ही रक्कम “पीएफ’ कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये हलगर्जीपणा केल्यास आणि त्यासंदर्भात लेखी तक्रार आल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक आणि प्रसंगी कायदेशीर कारवाईची तरतूद या नियमाद्वारे करण्यात आली आहे.

नोकरदारांच्या खात्यावर जमा झालेली ही रक्कम आपत्ती काळात काढण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम काढायची झाल्यास त्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत होता. त्यामुळे नोकरदारांना समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेवून विभागाने अर्ज करण्याची पध्दत बदलून ती ऑनलाईन केली आहे. त्यानंतर या कालावधीत घट होवून किमान आठ ते पंधरा दिवसांमध्ये ही रक्कम संबंधित नोकरदारांच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, आपत्तीच्या प्रसंगी ही रक्कम मिळण्यास आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असल्याने नोकरदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा आपत्तीच्या प्रसंगी ही रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी नोकरदार वर्गाकडून होत होती. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रसंगी ही रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती “पीएफ’ कार्यालयातील समन्वयिका नीलम कुलकर्णी यांनी दिली.

ऑनलाईनमुळे काम सुटसुटीत

यापूर्वी भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढायची झाल्यास अथवा त्यावर कर्ज घ्यायचे झाल्यास त्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागत होती. त्यातच टेबलांवरील फाईल्स पुढे सरकण्यासाठीही मोठा कालावधी लागत होता. ही कटकट टाळण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आली. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांत संबंधितांच्या खात्यावर ही रक्कम जमा होत आहे. या नव्या ऑनलाईन पध्दतीमुळे या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आला असून नोकरदारांनाही त्याचा फायदा झाला आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)