विश्रांतवाडी : विरोधकांनी मतदार संघाबाहेरचे भावनिक प्रश्न प्रचारात आणले. द्वेष निर्माण करणाऱ्या मोहिमा देखील राबविल्या.मात्र विरोधकांच्या कोणत्याही कृतीला मतदार विचारात घेणार नाहीत. त्यांनी माझ्या विरोधात केलेल्या कुटणीतीला प्रतिसादही मिळाला नाही. कारण हा विधानसभा मतदारसंघ मिनी इंडिया आहे. येथील मतदार सुशिक्षित व सुज्ञ असल्याने कुठल्याही भूल थापांना बळी पडणार नाहीत.
उलटपक्षी आम्ही मतदारांना सुरक्षित आणि प्रगतिशील कारभार देण्याचा विश्वास दिला. त्यामुळे नक्कीच विजय पक्का आहे, अशा भावना महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केल्या. निष्क्रिय आणि बदनाम उमेदवाराविरुद्ध आम्ही आवाज उठवत मतदारसंघातील वस्तुस्थिती मतदारांसमोर मांडली. त्यामुळे आम्हाला सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद मिळाला.सोबतीला स्थानिक प्रश्न देखील आम्ही जोरात उपस्थित केले.
जाहीर सभा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती, पदयात्रा, घरोघरी जाऊन घेतलेल्या वैयक्तिक भेटी, सोसायट्यामधील बैठका आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे माझा विजय निश्चित झाला आहे. आमचे दैवत शरदचंद्रजी पवार व महाविकास आघाडीची नियोजनबद्ध प्रचार मोहीम याला यश मिळाले आहे, असे प्रतिपादन बापूसाहेब पठारे यांनी प्रचाराची सांगता करताना केले.
त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानले.त्याचबरोबर पुढील दोन दिवस गाफील न राहता मतदारसंघातील सर्व परिसरात लक्ष ठेवण्याची सूचना केली. तसेच निकोप लोकशाही, संविधान प्रणित विकासाचा कारभार यासाठी सुजाण मतदार म्हणून बुधवारी(दि.२०) बापूसाहेब तुकाराम पठारे या नावासमोर असलेल्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.