पुणे – बिबवेवाडीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयाचा कोविडच्या उपचारांसाठी पूर्ण क्षमतेने वापर करता यावा, यासाठी या रुग्णालयाला तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.
हे रुग्णालय महापालिकेने ताब्यात घेतले असले तरी ऑक्सिजनच्या सुविधेअभावी ते पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही, दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून एकही व्हेंटिलेटरयुक्त बेड शिल्लक नसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांना व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी आमदार विकास निधीतून 20 लाख रुपये उपलब्ध करून दिले असून, प्रशासनाने खरेदीची प्रकिया तातडीने सुरू केली असल्याचेही मिसाळ यांनी स्पष्ट केले.
आमदार मिसाळ म्हणाल्या, कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना सर्व प्रकारचे बेड्स मिळताना अडचणी येत आहेत. ईएसआयसी रुग्णालयातील बेडची क्षमता 100 इतकी आहे. त्यापैकी 90 बेड्सवर ऑक्सिजन आणि 10 बेड्सवर व्हेंटिलेटरद्वारे रुग्णांवर उपचार होऊ शकतात. मात्र, ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी तेथे केवळ 30 रुग्णांवरच उपचार केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने ऑक्सिजन पुरवठा केल्यास आणखी 70 रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार आहे.