शिरूर तालुका शिक्षक संघांची शासनाकडे मागणी
शिक्रापूर (पुणे) -शिरूर तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेद्वारे सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षकाचे करोनामुळे निधन झाले. या शिक्षकाच्या कुटुंबीयांना 50 लाखांचा विमा मिळवून देण्यात यावा, यांसह इतर मागण्या शिरूर तालुका शिक्षक संघाच्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील अभिनव विद्यालयातील भरत नामदेव सरोदे या 51 वर्षीय शिक्षकाने 16 व 17 सप्टेंबर रोजी शिरूर नगरपालिका याठिकाणी कोविड सर्वेक्षण केले. कर्तव्य बजावत असताना करोनाचा संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला. मुळात या शिक्षकाला हृदयविकाराचा त्रास असताना सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांचा भीमा मिळवून द्यावा, अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे शिरूर-हवेली अध्यक्ष सोमनाथ भंडारे, सचिव नितीन माने, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव रामदास थिटे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा प्रतिनिधी मारुती कदम, दिलीप पवार आदी उपस्थित होते.