नागरिकांकडून सतर्कतेसाठी मागणी
पुणे – बाधितांची नावे नको परंतु परिसरातील नागरिकांना बाधितांच्या ठिकाणांची माहिती द्या, किमान तेथील नागरिक तरी गांभीर्याने नियम पाळतील, अशी मागणी होऊ लागली आहे.
शहरातील आर्थिक व्यवहार अधिक काळ ठप्प ठेवणे प्रत्यक्षात शक्य नाही. त्यामुळे आता ज्या भागात बाधित सापडला आहे, तेथील आजुबाजूच्यांना सांगणे आणि रोजच्या रोज त्या भागात जाऊन ते जाहीर करावे, जेणेकरून नागरिकांना त्याचे गांभीर्य लक्षात येईल आणि यातून सुरक्षितता बाळगता येईल, अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे.
करोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर शहर बंद ठेवण्यात आले, तरीही जीवनावश्यक गोष्टी खरेदीसाठी मोठा लोंढा बाहेर पडला आणि मोठ्याप्रमाणात कम्युनिटी संसर्गापर्यंत शहर पोहोचले. केवळ, ठराविक भागापुरतेच नव्हे तर झोपडपट्टी भागापर्यंत करोनाचा प्रादुर्भाव झाला. याला जबाबदार नागरिक स्वत:च आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
जीवनावश्यक गोष्टींची खरेदी तर आहेच; परंतु उगाच बाहेर पडणे, मॉर्निंग वॉकला जाणे, बाहेर जाऊन परिस्थिती पाहून येऊ अशा मानसिकतेने बाहेर पडणे, घरी बसून कंटाळा आला आहे, फेरफटका मारून येऊ, असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे शहरात हॉटस्पॉट तयार झाले आहेत.
शहरातील पेठांचा भाग यातून मोठ्या प्रमाणात संक्रमीत झाला आहे. चिकटून असलेली घरे आणि बाहेर पडणाऱ्या लोकांचे प्रमाण हे त्याला कारणीभूत ठरले आहे. रुग्णाचे नाव नियमानुसार जाहीर करता येत नाही. परंतु, आता तुमच्या शेजारीच रुग्ण सापडला आहे, हे आता त्या-त्या ठिकाणी जाऊन सांगणे आणि काळजी घेण्याचे आवाहन करणे, हा पर्याय राहिला आहे. यावर प्रशासन कोणता निर्णय घेईल, हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.