शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, तातडीने नुकसानभरपाई द्या

सातारा  – पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दैना झाली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी आणि तातडीची नुकसानभरपाई मिळावी, या मागण्यांचे निवेदन जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना आज देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षांत प्रथमच एवढा प्रचंड पाऊस झाला.

नोव्हेंबर महिना सुरू असतानाही जागोजागी पाऊस पडतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याला अतिपावसामुळे महापुरालाही सामोरे जावे लागले. परतीच्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला पिकांचा घासही हिरावल्याने शेतकरी पुरता नागवला गेला आहे.

अशा परिस्थितीत तांत्रिक कारणांचा बाऊ न करता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि सरसकट कर्जमाफी मिळावी, पाटण व कराड तालुक्‍यात महापुरामुळे नुकसान झालेल्या सर्वच आपद्‌ग्रस्तांना शासनाने घोषित केलेली मदत तातडीने मिळावी, वाई, खंडाळा, जावळी व सातारा या तालुक्‍यांच्या पश्‍चिमेकडील डोंगरी भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. बांध, ताली वाहून गेल्याने मातीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या नुकसानीतून सावरण्यास त्यांना बराच काळ लागणार आहे.

या शेतकरयांना युद्धपातळीवर मदत करावी, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेला करता आले नसल्याने नजरपाहणीद्वारे नुकसान मान्य करून प्रत्यक्ष पंचनाम्याची अट शिथिल करावी, प्रतिहेक्‍टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, विहिरींवरील वीजपंपांची आणि उपसा सिंचन योजनांची वीज बिले माफ करावीत, पीक विमा कंपन्यांनी सर्व शेतकऱ्यांना सरसरकट विमा रक्‍कम मंजूर करून तातडीने शेतकऱ्यांना देण्याबाबत विमा कंपन्यांना आदेश द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी बाबासाहेब कदम, ऍड. बाळासाहेब बागवान, ऍड. विजयराव कणसे, रजनी पवार, धनश्री महाडिक, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, अन्वर पाशा खान, मनोज तपासे, नरेश देसाई, ऍड. दत्तात्रय धनावडे, सुषमा राजेघोरपडे, मालन परळकर, शरद मोरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.