महापौर मोहोळ यांची अधिष्ठाता डॉ. तांबे यांच्याकडे मागणी, “व्हेंटिलेटर’बाबतही चर्चा
पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयातील किमान 60 टक्के बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे केली आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मोहोळ यांनी
डॉ. तांबे यांची भेट घेतली.
पुणे शहरात दररोज सरासरी 25 हजारांपेक्षा जास्त करोना संशयितांच्या चाचण्या होत असल्या, तरी त्यातील सरकारी पातळीवरील आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या केवळ 2 हजारांच्या आसपास आहे. ही संख्या तातडीने वाढवावी, यासाठी गेली अनेक दिवस आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत, असे मोहोळ म्हणाले.
यासंदर्भात डॉ. तांबे यांच्याकडे तातडीने ही क्षमता वाढवण्यासाठी चर्चा केली. सरासरी 25 हजार पैकी 23 हजार चाचण्या या खाजगी लॅबमधून होत असल्याने संसर्गाची भीती जास्त आहे. कारण खाजगी लॅबमध्ये टेस्टिंग केल्यावर संबंधित रुग्ण संबंधित व्यक्ती विलगीकणात राहीलच असे नाही, त्यामुळेच संसर्ग वाढण्याचा धोका आहे, असे मोहोळ यांचे म्हणणे आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ससून रुग्णालयात एकूण बेडची संख्या 1 हजार 750 इतकी आहे. मात्र असे असतानाही करोनासाठी केवळ 520 बेड ससूनने उपलब्ध केले आहेत. एकीकडे शहरातील सर्व रुग्णालयांचे 80% बेड कोविडसाठी राखीव ठेवले असताना ससूनमध्ये मात्र ही टक्केवारी अत्यंत कमी आहे. म्हणूनच ससूनमध्ये किमान 60 टक्के बेड तरी राखीव ठेवावेत, या संदर्भातही चर्चा केली. असे झाल्यास आणखी जवळपास 500 बेड उपलब्ध होतील, असे मोहोळ यांनी डॉ. तांबे यांना सांगितले.
ससून रुग्णालयात पीएम केअरच्या माध्यमातून एकूण 86 व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यापैकी 54 व्हेंटिलेटर सुरू असून, 32 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे डॉ. तांबे यांच्याकडून सांगण्यात आल्याचे मोहोळ म्हणाले.
पुणे महापालिकेला पीएम केअरमधून एकूण 34 व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यापैकी 33 व्हेंटिलेटर सुरू असून, त्याचा वापर उपचारांसाठी केला जात आहे. पुणे महापालिकेला मिळालेले व्हेंटिलेटर सुरू असताना ससूनमधील व्हेंटिलेटर बंद राहण्याचे कारण काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे त्याचाही खुलासा लवकर होईल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे