4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदलातर्फे नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचा नौदल दिन हा नौदलासाठीच नाहीतर संपूर्ण देशासाठी खास आहे. या नौदलदिनी नौदलाला पहिली महिला पायलट मिळणार आहे. शिवांगी स्वरुप असे या महिला पायलटचे नाव आहे. भारतीय नौसेनेत महिलांचा समावेश असला तरी पायलट म्हणून कोणत्याही महिलेची निवड झाली नव्हती. हा मान मिळाला तो शुभांगी स्वरूप हिला, म्हणूनच तिची निवड ऐतिहासिक आहे.
24 वर्षाची शिवांगी ही मूळची बिहारमधील मुज्जफरपुरची आहे. सिक्कीम मणीपाल युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यावर तिने जयपूरच्या मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. तेथे नौदलातील काही अधिकारी नौदलातील संधीविषयी माहिती देण्यासाठी आले होते. त्यांनी केलेले सादरीकरण पाहून तिने नौदलात जाण्याचा निर्णय घेतला. सुरवातीच्या प्रशिक्षणानंतर मागील वर्षी ती नौदलात भरती झाली. भारतीय नौदलाच्या अकादमीच्या एझिमालामध्ये 27 एन ओ सी कोर्सच्या एस एस सी पायलट म्हणून ती काम करू लागली. शिवांगीने नौसेनेत येण्यापूर्वी हवाई दलाचे सहा महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणात तिला नौदलातील के पिलाटस पी सी- या विमानाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेऊन सब लेफ्टनंट पदावर आता ती पायलट झाली आहे.
नौदलाच्या कोची येथील ऑपरेशन विभागात तिची पोस्टिंग होणार असून तिथे ती फिक्स विंग डॉर्नियर सर्व्हीलांस हे विमान चालवणार आहे. हे विमान कमी अंतरावरील समुद्री मोहिमेवर पाठवले जाते. यात ऍडव्हान्स सर्व्हीलन्स रडार, नेटवर्किंग व इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसवलेले असतात. शुभांगी स्वरूप यांच्या या ऐतिहासिक निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. शुभांगी स्वरूप हिची कामगीरी अभिमानास्पद अशीच आहे. नौदलाने शुभांगी स्वरूप हिला पायलट म्हणून संधी देण्याचा निर्णय घेऊन महिला शक्तीचा गौरवच केला आहे. महिला अबला नसून सबला आहे हाच संदेश नौदलाने देशवासियांना दिला आहे. शुभांगी स्वरूप ही देशांतील महिलांना महिलांसाठी प्रेरणास्रोत आहे.
-श्याम बसप्पा ठाणेदार