वॉशिंग्टन – दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अमेरिकेतही आज विविध ठिकाणी भारतीय नागरीकांनी निदर्शने केली. शिख अमेरिकन नागरीकांच्या वतीने या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.
कॅलिफोनिर्यात निदर्शकांनी वाहनांचा मोठा ताफा रस्त्यावर नेऊन निदर्शने केली त्यामुळे बे ब्रिज वर वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहने सॅन फ्रांसिस्को येथील भारतीय दूतावासाकडे नेली जात होती. इंडियाना पोलिस येथेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेकडो लोकांनी निदर्शने केली.
दोन्ही ठिकाणच्या निदर्शनांच्यावेळी भारतातील शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. ऐन थंडीत दिल्लीच्या रस्त्यांवर 26 नोव्हेंबर पासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने त्वरीत न्याय द्यावा अशी मागणीही निदर्शकांच्यावतीने करण्यात येत होती.