पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुण्यात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकासमोर आंदोलन करत कार्यकर्त्यांनी या वक्तव्याचा निषेद नोंदवला आहे.
या वेळी कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सावरकरांचे पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, रेप इन इंडिया या विधानावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप कडून करण्यात येत होती. यावर बोलताना मी सत्य बोललो आहे. त्यामुळे माफी मागणार नाही. तसेच माझं नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही. असे वादग्रस्त विधान राहुल गांधींनी केलं आहे. त्यानंतर या विधानाला जोरदार विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राहुल गांधीने केलेल्या विधानानंतर राज्यात भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर खासदार संजय राऊत यांनी देखील या विधानाला विरोध दर्शवत राहुल यांचे कान टोचले आहेत.