बर्लिन- करोनाव्हायरसमुळे पसरत असलेल्या कोविड19 ची दुसरी लाट युरोपमध्ये येत आहे. त्यामुळे अनेक देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचे अस्त्र उपसले आहे. मात्र, गेल्या सुमारे सहा महिन्यांतल्या लॉकडाऊनला वैतागलेल्या नागरिकांनी त्याविरोधात आता खुली निदर्शने सुरु केली आहेत.
युरोपात आतापर्यंत कोरोनाचे 1.30 कोटी रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन व स्पेनसह अनेक देशांत दररोज विक्रमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे काही देशांत लॉकडाऊन व रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
करोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीत निर्बंध लागू केले जाऊ नयेत, असे लोकांना वाटू लागले आहे. त्याचाच भाग म्हणून जर्मनी, ब्रिटन, फ्रान्समध्ये लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. जर्मनीच्या लिपलिग शहरात 20 हजारांहून जास्त लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला. करोना काळात आधीच आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यात लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. युरोपात सर्वाधिक 18.20 लाख रुग्ण रशियात आहेत. फ्रान्समध्ये 18.10 लाख रुग्ण आहेत.
आता अशा मोठ्या प्रमाणावरील निदर्शनांमुळे सरकारपुढे करोना नियंत्रणाच्या उपायांबाबत पेचप्रसंग निर्माण झाला असून, अद्याप औषधोपचार अथवा लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची मानसिकता कशी हाताळायची याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.