विशिष्ट गीतांतून दिला अन्यायाविरोधातला संदेश
न्यूयॉर्क – हैदराबादमध्ये युवतीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येने पूर्ण देश हादरून गेला होता. पण हैदराबाद पोलिसांकडून आरोपींचा खात्मा करण्यात आल्याने लोकांचा संताप काही प्रमाणात तरी शमला आहे. पण देशभरातील बलात्काराची प्रकरणे अद्याप थांबलेली नाहीत. हैदराबादनंतर बलात्काराची कित्येक प्रकरणे समोर आली आहेत. केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्वच देश लैंगिक शोषणाच्या गुन्हयांमुळे त्रस्त आहेत. पण अशाप्रकारच्या गुन्हयांच्या विरोधात आता महिलाच एकवटू लागल्या आहेत. चिली, व्हेनेझुएला आणि जर्मनीत हजारोंच्या संख्येत महिला रस्त्यांवर उतरून निदर्शने करत आहेत. या महिलांना एका गीताचा आधार मिळाला आहे.
या महिलांच्या निदर्शनांमुळे आता पुरुषांना स्वतःची मानसिकता बदलावी लागेल हे निश्चित. दक्षिण कोरियात पुरुषांच्या वाईट मानसिकतेपोटी महिलांनी विवाह, शारीरिक संबंध आणि मुलांना जन्म देण्यास नकार देण्याची मोहीम हाती घेतली आहे. तर चिली, व्हेनेझुएला आणि जर्मनीत निदर्शने करणाऱया महिलांमध्ये एक गीत वेगाने प्रसारित होत आहे. या तिन्ही देशांमधील महिला या गीताद्वारेच स्वतःचा विरोध व्यक्त करत आहेत. “रेपिस्ट इज यू’ असे या गीताचे शब्द असून ते सद्यकाळात बलात्काराच्या विरोधातील जगातील महिलांचा आवाज ठरत चालले आहे.
आर्थिक संकटग्रस्त व्हेनेझुएलात महिलांसोबत होणारे गुन्हे मागील दशकात वाढले आहेत. महिलांना वेश्याव्यवसायात ढकलले जात आहेत. महिलांना मानवी तस्करीद्वारे त्रिनिदाद आणि टोबेगो यासारख्या देशांमध्ये विकले जातेय. तर महिलांच्या विरोधात वाढणाऱया गुन्हयांमुळे इटलीतही मोठा संताप निर्माण झाला आहे. तेथील महिला रस्त्यांवर उतरून संताप व्यक्त करत आहेत. व्हेनेझुएलाच्या धर्तीवर इटलीतील महिला रस्त्यांवर उतरून “रेपिस्ट इज यू’ गाणं म्हणत आहेत.
नागरिकांच्या हत्येसह महिलाविरोधी गुन्हयांमध्ये डोमनिक प्रजासत्ताक हा देश खूपच पुढे आहे. अशाप्रकारच्या गुन्हयांमुळे वैतागून महिलांनी आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन चालविले आहे. महिलांनी आंदोलनादरम्यान डोळयांवर काळी पट्टी बांधली होती. तुर्कस्तानातही महिलाविरोधी गुन्हे सातत्याने वाढत आहेत. आता तेथील महिला अशाप्रकारच्या गुन्हयांच्या विरोधात एकवटत आहेत. या महिलांनी बलात्काराच्या विरोधात जगाचा आवाज ठरलेले “रेपिस्ट इन योअर पाथ’ हे गीत म्हटले.
मध्य आशियातील लेबाबनमध्ये बलात्काराच्या घटना गेल्या सात वर्षांत दुप्पटीने वाढल्या आहेत. आता तेथील महिला रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहेत. चिलीमध्ये वाढत्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी निदर्शने केली आहेत. गुन्हेगारांना कठोर तसेच लवकर शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे. तर मेक्सिकोच्या रस्त्यांवर शेकडो महिलांनी उतरून देशात वाढत्या गुन्हयांप्रकरणी निदर्शने केली आहेत.