“गंगूबाई…’च्या विरोधात निदर्शने

मुंबई – आलिया भट्टचा आगामी चित्रपट “गंगूबाई काठियावाडी’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कामठीपुरा येथील रहिवाशांनी चित्रपटाचा निषेध केला आहे. चित्रपटात कामठीपुरा परिसराचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

संजय लिला भन्साळीच्या यापूर्वीच्या सिनेमांच्या बाबतीतही वादविवाद झाले होते. यापूर्वी “पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ हे सिनेमेही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. “गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भटला कामठीपुरा येथील एका वेश्‍यागृहाची प्रमुख म्हणून दाखविले आहे.

कामठीपुरा येथील रहिवाशांनी या गोष्टीला विरोध केला आहे. कामठीपुरा भागाला मुंबईचा “रेड लाईट एरिया’ म्हटल्याबद्दल येथील काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. कामठीपुरा भागाला असलेला 200 वर्षांच्या इतिहासाकडे संजय लिला भन्साळी यांनी डोळेझाक केली असा आक्षेप स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे.

या भागाची बदनाम प्रतिमा बदलण्यासाठी अनेक लोकांनी कित्येक वर्षे प्रयत्न केलेले आहेत. पण सिनेमामुळे कामठीपुराची पुन्हा बदनामी होते आहे. त्यामुळे त्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे या लोकांनी म्हटले आहे. नागरिकांच्या समस्या जाणून न घेता केवळ पैसा कमवण्याकडेच भन्साळी यांचा कल आहे, असा आक्षेपही नागरिकांनी केला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.