इंफाळ – इंफाळमधील दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरात घुसत आंदोलकांनी शनिवारी हल्ला केला. मंत्री आणि आमदारांच्या घरांवर जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे इंफाळ पश्चिम प्रशासनाला जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करावे लागले. हल्ल्याच्या या घटनेनंतर इंफाळ पश्चिम, पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूरमध्ये इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जमावाने लांफेल सनाकीथेल भागात असलेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या घरावर हल्ला केला. आंदोलक सगोलबंद भागातील भाजप आमदार आरके इमो यांच्या घराबाहेर जमले होते. आंदोलकांनी सरकारने 6 जणांच्या हत्येप्रकरणी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली. ही मागणी करतानाच आंदोलकांनी घोषणाबाजीही करायला सुरुवात केली. इमो हे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे जावई आहेत.