साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक करणारे आंदोलक ताब्यात

सातारा – राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे जावळी सोसायटी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करत निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आ.शिंदे यांना अडचणीत आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

जावळी सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञामदेव रांजणे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत रांजणे यांनी सुरुवातीपासून मजबूत पकड ठेवली होती.

रांजणे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व मानणारे असल्याने ते माघार घेतील अशी शक्यता होती. मात्र, अनेक राजकीय घडामोडी घडूनही रांजणे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

या मतदारसंघात चुरशीने 49 पैकी 49 मतदान झाले होते. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.मंगळवारी मतमोजणी वेळी पहिला निकाल जावळीचा लागला.यात एक मताने रांजणे विजयी झाले.

आ. शिंदे यांच्या पराभवास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेते कारणीभूत असल्याचा आरोप करत समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा येथील कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. आ. शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.