वॉशिंग्टन – अमेरिकेतील वर्णभेदविरोधी आंदोलनादरम्यान मेरीलॅन्ड प्रांतातील बाल्टीमोरमधील ख्रिस्तोफर कोलंबस यांचा पुतळाही पाडण्यात आला. शनिवारी आंदोलकांनी दोर लावून हा पुतळा उखडून काढला आणि शहरातील बंदरामध्ये पाण्यात फेकून दिला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त जवळच आतषबाजी केली जात असतानाच आंदोलकांनी अमेरिकेच्या या आदरणीय व्यक्तीच्या पुतळ्याला जमिनदोस्त केले. हा पुतळा आंदोलक पाडत असतानाचा व्हिडीओ स्थानिक प्रसार माध्यमांनी प्रसारीत केला आहे.
मिनियापोलीसमध्ये 25 मार्च रोजी पोलीसांच्या क्रूरतेमुळे जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णिय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात वर्णभेदविरोधी आंदोलन भडकल्यापासून आंदोलकांनी राष्ट्रीय स्मारक आणि
माननीय व्यक्तींच्या पुतळ्यांची मोडतोड करण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा पुतळा हटवण्यात यावा, अशी सूचना बाल्टीमोर नगर परिषदेचे अध्यक्ष ब्रॅन्डन स्कॉट यांनी पूर्वीच केली होती.
बाल्टीमोरमधील इटालीयन अमेरिकन नागरिकांचे आपण समर्थन करतो आहोत. आपण कोलंबस यांचे समर्थन करत नाही. हा पुतळा म्हणजे वंशभेदाचे प्रतिक मानले जात होते. त्यामुळे हा पुतळा पूर्वीच हटवायला पाहिजे होता, असे त्यांनी म्हटले आहे.
देशाच्या अन्य भागातही वंशभेदाचे प्रतिक असलेल्या अन्य वास्तू आणि स्मारकांचीही आंदोलकांनी नासधूस केली आहे. पोर्टलॅन्ड, ओरिगॉनमध्ये आंदोलकांनी गेल्या महिन्यात जॉर्ज वॉशिंग्टन यांचा पुतळाही
अशाचप्रकारे जमिनदोस्त केला होता आणि त्या पुतळ्याच्या शिराला पेटवून दिले होते. व्हर्जिनियातील रिचमंड इथे जेफरसन डेव्हिस यांचा पुतळा पाडण्यात आला आहे.