पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्थेचा गळा घोटण्याचा आरोप
पिंपरी – नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वायसीएमच्या डॉक्टरांवर केलेल्या टिकेचे पडसाद महापालिका भवनात उमटले. डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.24) महापौर उषा ढोरे यांची भेट घेत, मागणीचे निवेदन सादर केले.
लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा निषेध करत, काळी फित लावून कामकाज केले. तसेच आम्ही आमच्या स्वाभिमानाशी तडजोड करण्यास तयार नसल्याचे ठणकावून सांगितले. वायसीएमवर अधिराज्य गाजविण्याच्या हव्यासापोटी केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या वैद्यकीय शिक्षण संस्थेचा गळा दाबण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचा आरोप, डॉक्टरांनी या निवेदनात केला आहे.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, शेलक्या भाषेत टीका करण्यात आली. या सभेत वायसीएम रुग्णालयाच्या पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह महापालिका सेवेत असलेल्या डॉक्टरांवर टीका करण्यात आली होती. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात अध्यापन कार्य करणाऱ्या डॉक्टरांना अशी वागणूक देणे योग्य नाही.
अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना महासभेत बोलावुन अवमानकारक भाषेत बोलले जाते. वायसीएमवर अधिराज्य गाजविण्याच्या हव्यासापोटी केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या वैद्यकीय शिक्षण संस्थेचा गळा दाबण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचा आरोप, डॉक्टरांनी या निवेदनात केला आहे. नगरसेवकांकडून डॉक्टरांवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे.
महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ
दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुट्टया, प्रोत्साहन भत्ता आणि वेतनातील वाढ देण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या दफ्तर दिरंगाईला कंटाळुन या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महापौर माई ढोरे यांची 9 जुलैला भेट घेत, याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती.