मुंबई – सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप (Shelf in Shop) या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र महाराष्ट्रात विरोध करणाऱ्या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत तर दारू विक्रीचे धोरण थक्क करणारे आहे.
राज्यात पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त असून काही जिल्ह्यातील दारूबंदी संपवून नवीन दारूविक्री परवाने देण्यात आले. आता तर सुपर मार्केटमध्ये दारूविक्रीला परवानगी देऊन घरोघरी दारू पोचवण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे, असा सवाल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर राज्यातील सरकारला बेवड्यांना समर्पित सरकार म्हटलं. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात दारू विक्रीबाबतचे धोरण थक्क करणारं आहे. मध्य प्रदेशातील मंत्रीमंडळाने घरांमध्ये मद्याची साठवणूक करण्याची मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे आता लोक पूर्वीपेक्षा चार पट अधिक मद्य घरात ठेवू शकणार आहेत. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये आहे, ते घरीच बार उघडू शकणार आहेत. अर्थात घरातून दारू विकू शकणार आहेत.
मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाने विदेशी मद्यावरील अबकारी शुल्क १० वरून १३ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मद्याचे दर कमी होणार आहेत.