नगर – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर पन्नास टक्क्यांहून देखील खाली आलेले आहेत. असे असताना केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक इंधनाचे दर वाढवून सामान्य माणसांचे जीवनमान उध्वस्त करत आहे.
पेट्रोल, डीझेल व गरगुती गॅस आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेला आहे. त्यास केंद्रातील मोदी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे आज नगरमध्ये सरकारविरोधी निदर्शने करण्यासाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगरसेवक अनिल शिंदे, अनिल बोरुडे, गणेश कवडे, गिरीश जाधव, शरद झोडगे, संजय आव्हाड, महिला आघाडीप्रमुख आशा निंबाळकर, मदन आढाव, अमोल येवले यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.
नगर शहरातील जुन्या बसस्थानक चौकात अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बैलगाडीतून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधी घोषणा दिल्या. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी यावेळी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅस सामान्यांची दररोजची गरज आहे. मात्र, त्याच्या किंमती आता प्रचंड प्रमाणात वाढल्याने सामान्य माणसाला जगणे नकोशे झाले आहे. त्यास केवळ मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप सातपुते यांनी केला. शिवसेनेच्या अन्य पदाधिकार्यांनीही यावेळी सरकारावर कोरडे ओढले.