विविधा : संरक्षक भिंत- दगडमातींची आणि लेसर किरणांची 

अश्‍विनी महामुनी 

दोन देशातील सीमा हा नेहमीच वादाचा मुद्दा होत आलेला आहे. दोन देशातीलच कशाला, कोणत्याही दोन सीमा या सदैव वादाचा मुद्दा असतात, मग त्या दोन देशातील असोत, दोन राज्यातील असोत, दोन गावातील असोत अथवा दोन घरातील-एका घरातील आणि त्यतील माणसांच्या मनातील सीमा असोत. त्यवरून वाद हा ठरलेला. अगदी अनादी कालापासून हा सीमावाद चालू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्याकडेही पाकिस्तान आणि चीनबरोबरच्या सीमांवरून सदैव वाद चाललेले असतात. पाकिस्तानसारखा कुरापतखोर शेजारी तर आये दिन खूनखराबा करतच असतो. भारताने त्यासाठी सीमेवर कुंपण बांधण्याचा पर्याय निवडलेला आहे.
उलटपक्षी मेक्‍सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी अमेरिकेत राजकीय रणकंदन चालले आहे.

अमेरिकेतील पेचप्रसंग सध्या जगभर चर्चेचा विषय झालेला आहे. तसं पाहिलं तर तो अमेरिकेचा अंतर्गत प्रश्‍न आहे. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रेटिक पक्ष यांच्यातील हा विषय आहे. पण अगदी देशात आणीबाणी लागू करण्याची वेळ येईपर्यंत तो ताणला गेला आहे. प्रश्‍न आहे भिंतीचा. अमेरिका आणि मेक्‍सिको यांच्यामधील सीमेवर भिंत बांधण्याचा अध्यक्ष ट्रम्प यांचा हट्ट आहे. ट्रम्प यांची अगदी सुरुवातीपासून हट्टी-दुराग्रही अशी एक इमेज तयार झालेली आहे. त्या इमेजशी त्यांची आताची भूमिका शोभेशी आहे. मेक्‍सिको सीमेवरून अमेरिकेत घुसखोरी होऊ नये यासाठी ट्रम्प यांचा अट्टहास आहे. त्यासाठी त्यांना मेक्‍सिकन सीमेवर भिंत बांधायची आहे. त्यासाठी सुमारे 5.7 अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे आणि तो देण्यास डेमॉक्रेटिक तयार नाहीत. हा खर्च म्हणे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असे त्यांचे सरळ सरळ मत आहे.
आणि या भूमिकेवरून दोन्ही पक्ष अटीतटीला आलेले आहेत.

गेले दोन आठवडे अमेरिकेत आंशिक शट डाऊन आहे. लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. आणि आता तर ट्रम्प यांनी आणीबाणी घोषित करण्याची धमकी दिली आहे. आणीबाणी घोषित केल्यानंतर ट्रम्प यांना सिनेटच्या मंज़ुरीशिवाय भिंतीसाठी लागणारा निधी वापरता येणार आहे. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार भारताच्या सीमेवर लेसर व भिंत उभारण्याची तयारी चालू आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी एक रामबाण उपाय शोधून काढलेला आहे. जालंदर, पंजाब येथील 106 व्या सायन्स कॉंग्रेसमध्ये लेसर व भिंतीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. भारतीय लष्कराने त्याचे सफल परीक्षण केलेले आहे. लेसर किरणांची भिंत उभारण्याचा यशस्वी प्रयोग जमिनीवर, जमिनीखाली आणि पाण्याखालीही सफल झालेला आहे. त्यामुळे कोठूनही घुसखोरी करण्यास वाव राहणार नाही. लेसर किरणांची ही भिंत अदृश्‍य असल्याने तिचा पत्ता लागणारच नाही.

मात्र, लेसर भिंतीच्या संपर्कात येताच शत्रूची माहिती कंट्रोल रूममध्ये ताबडतोब मिळणार आहे. आणि त्यानुसार कारवाई करणे सहजसोपे होणार आहे. लास्टेक (लेसर अँट सायन्स टेक्‍नॉलॉजी) दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी हे लेसर भिंतीचे तंत्र शोधून काढलेले आहे. लष्कराने जम्मू-काश्‍मीर सीमेवर जवळपास 60 ठिकाणी लेसर भिंतीचे यशस्वी परीक्षण केलेले आहे. मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी लास्टेक या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणार आहे. लेसर भिंतीसाठीचे हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान आहे. याच्या एका उपकरणाने 100 ते 500 मीटर्सपर्यंत लांबीची इन्फ्रा रेड लेसर किरणांचे अदृष्य आणि अभेद्य संरक्षक भिंत उभारता येते.

अधिकाधिक मशीन्स वापरून भिंतीचे क्षेत्रफळ वाढवता येते. ही भिंत वायफाय संवेदी असल्याची माहिती लास्टेकचे को-ऑर्डिनेटर वीरेंद्र शर्मा यांनी दिली आहे. ती पार करण्याचा थोडा जरी प्रयत्न झाला, तरी कंट्रोल रूममध्ये त्याची माहिती दिली जाईल. त्याचा रियल टाईम व्हिडीयो कंट्रोल रूममध्ये दिसेल. घुसखोरांची संख्या, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे लगेचच कळू शकतील आणि त्वरित कारवाई करणे सहजशक्‍य होईल. जम्मू-काश्‍मीरसारख्या क्षेत्रात भारत-पाक सीमेवर अदृष्य आणि परिणामकारक लेसर भिंत अत्यंत उपयुक्त सिद्ध होणार आहे. या भागातील सुमारे 2026 किमी लांबीच्या क्षेत्रात लेसर भिंत उभारण्यात येणार असल्याचे समजते. मेक्‍सिको सीमेवरील भिंत आणि भारताची लेसर भिंत यातील फरक वेगळा सांगण्याची आवश्‍यकताच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)