रसाहार आणि आरोग्य रक्षण

शीतपेयांची क्रेझ आजकाल लोकांना फारच. 12 महिने शीतपेये पिणारे लोकं आहेत. उन्हाळ्यात तर अशा शीतपेयांना खूपच मागणी. या शीतपेयांमध्ये माजा, थम्सअप, कोकाकोला अशा एक ना अनेक “ठंडा’चे वर्चस्व असते. शीतपेय उत्पादकांनी, सिनेतारकांनी व क्रिकेटपटूंनीही ह्या कोल्ड्रिंकच्या जाहिराती करून तमाम जनतेच्या मनावर इतका काही कब्जा मिळवला आहे की बस! अबालवृद्धांमध्ये ही शीतपेयं लोकप्रिय आहेत. पृथ्वीवर दुसरं काही थंड असूच शकत नाही असे काहीसे या कोल्ड्रिंकचे समीकरण करून टाकलय.

आरोग्य व पर्यावरण संघटनांनी शीतपेयांच्या घातकपणाविषयी किती ओरड केली तरी आपल्याला त्याची फिकीर नसते. दुसऱ्याला आपण ह्या शीतपेयांचे घातक परिणाम सांगायला जातो पण आपण ती पितोच. कारण आपल्याला माहिती असते की घातक कीटकनाशके व रसायने आपण सहजपणे पचवू शकतो. पण हा केवळ गैरसमज आहे. ह्या ठंडा मतलब शीतपेयांचे इतके काही घातक परिणाम आहेत की विचारू नका. ही शीतपेयं म्हणजे आरोग्याला स्लो पॉयझनिंगच आहेत.
काही महिन्यापूर्वी लहान मुलांच्या चॅनेलने एक कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाला लहान मुलांची बरीच गर्दी होती व त्यांचे सुशिक्षित व सुज्ञ पालक त्यांना कौतुकाने शीतपेय घेऊ देत होते. याच शीतपेयामध्ये काहींना किटकनाशकं आढळली. याबद्दल वरपर्यंत तक्रार केल्यावर त्यानंतर उत्पादकांनी आपली चूक सुधारली, क्षमा मागितली असं म्हणे. खरं खोटं कोणास ठाऊक. असे अनेक प्रसंग घडतात. कोणाला कोल्ड्रिंकमध्ये मुंगळा आढळतो तर कोणाला लोखंडाची तार. हे एवढं सगळं घडून आपण काही शीतपेयं प्यायचं बंद करीत नाही ते नाहीच. या शीतपेयांमध्ये असणारे घटकही फार काही चांगले नसतात. शीतपेयांचे उत्पादन करताना त्यामध्ये जी रसायने वापरलेली असतात त्यांचे शरीरावर अनिष्ट परिणाम होतात. शीतपेयांमध्ये खालील घटक असतात. त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसायला लागतात जे आपल्याला कळतही नाहीत.

साखर शीतपेयांमध्ये साखरेशिवाय कोणताही अन्नघटक नसतो. 330-350 कि. ली. कोलामध्ये साधारण 6-8 टी. स्पून साखर असते. या साखरेमुळे चरबी वाढण्यास मदत होते व वजन प्रचंड प्रमाणात वाढते. मेदाच्या चयापचयात बिघाड होतो. त्यामुळे यकृत व स्वादूपिंड यांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी मधुमेहासारखे दुखणे मागे लागते. साखरेमुळे दात बिघडण्याच्या तक्रारी वाढतात.

कार्बन-डाय-ऑक्‍साईड : शीतपेयांना कार्बोनेटेड ड्रिंक असेदेखील म्हटले जाते. कारण शीतपयामध्ये सीओ टू वायू प्रचंड दाबाखाली सोडण्यात येतो. याला कार्बोनेशन असे म्हणतात. त्यामुळे शीतपेयाची बाटली उघडताच ड्रिंक फसफसून बाहेर येते. अतिसेवन केल्यास सीवो टू मुळे ऍसिडीटी व मळमळण्याचा त्रास होतो. पाचक स्त्राव कमी स्त्रवू लागतो व त्यामुळे भूक मंदावते. सीवो टू मुळे श्‍वसन संस्थेवर देखील वाईट परिणाम होतो.

फॉसफॉरिक ऍसिड : हे ऍसिड वापरण्याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे हे ऍसिड चुरचुरणारी चव देते. दुसरे म्हणजे शीतपेय लवकर खराब होऊ नये म्हणून त्याच्या पीएच कमी ठेवावा लागतो. पी एच कमी करण्यासाठी या ऍसिडचा भरणा केला जातो. या ऍसिडमुळे हाडांमधील कॅल्शियम शोषले जाते. परिणामी हाडे ठिसूळ होतात व लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते. मूतखड्यांच्या विकाराचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हे ऍसिड दात किडण्याची क्रिया वेगाने होण्यास कारणीभूत ठरते. चॉकलेटपेक्षा दात किडण्याची क्रिया शीतपेयांमुळे लवकर होते. कारण चॉकलेटमध्ये साखरेच्या जोडीला ऍसिड नसते.

शीतपंयामध्ये रंग येण्यासाठी विविध रंग / डाय वापरले जातात. या रंगामुळे ऍलर्जी होऊ शकते. यलो 5 डाय हा दम्यासारख्या विकारास कारणीभूत ठरतो व लाल/ चॉकलेटी रंगासाठी कॉकचीनील हा डाय वापरतात याचीदेखील ऍलर्जी होऊ शकते व हा डाय कॅन्सरसारखे विकार उत्पन्न करू शकतो.

इथिलीन ग्यालॉल हा एक घटक असा आहे की त्यामुळे शीतपेयाचे तापमान कमी होते व फ्रीजशिवाय देखील पेय अतिशय थंड राहाते. इथिलीन ग्लायकॉलचा वापर “कार-कुलंट’ म्हणून देखील केला जातो. हे कॅन्सर उत्पन्न करणारे आहे. कॅफीन हे एक उत्तेजक द्रव्य आहे. याच्या सेवनाने मेंदूला तात्पुरती तरतरी येते व मेंदूला उत्तेजन मिळते.

त्यामुळे कॅफीनचे व्यसन लागते व परिणामी जास्त प्रमाणात शीतपेय प्यावेसे वाटते. भारतामध्ये मिळण्याच्या शीतपेयांमध्ये साधारण 37-55 मि. ग्रॅ. कॅफीन असते. कॅफीनमुळे निद्रानाश, अल्सर, ब्लडप्रेशर, अर्धशीशी, छातीत जळजळणे यासारखे विकार होतात. हाडे ठिसूळ करण्याचे काम देखील कॅफीन व्यवस्थित करते.

ऍस्पारटेम : बाजारात डाएट कोला म्हणून जी शीतपेये मिळतात त्यामध्ये साखरेऐवजी ऍस्पारटेमचा वापर केलेला असतो. हे एक लो- कॅलरी स्वीटनर आहे, त्याच्या सेवनाने वजन वाढत नाही. ऍस्पारटेमच्या अति सेवनाने कर्करोग होऊ शकतो. प्राण्यांवर याचा प्रयोग करून पाहिल्यावर त्यांना ब्लॅड कॅन्सर झाल्याचे आढळून आले.

गर्भवती स्त्रियांनी याचे सेवन करू नये कारण हे बाळाच्या वाढीवर अतिशय घातक परिणाम करते. अशी ही घातक शीतपेये न घेतलेलीच बरी नाही का….!! अशा शीतपेयांवाचून काही आपलं अडलंय का? त्याला कितीतरी पर्याय आपल्याकडे आहेत.

शीतपेयांना अनेक पर्याय…

उन्हाळ्यामुळे शरीरातील पाणी हे घामावाटे जास्त प्रमाणात बाहेर पडते. त्यामुळे आपल्याला जास्त तहान लागते. तहान भागवण्यासाठी तुम्ही शीतपेयांशिवाय इतर बरेच पेय वापरू शकता जे पौष्टिक आहेत व जे शरीराला आरोग्यदायी बनवतात.

थंड पाणी : खूप तहान लागल्यास 1 ग्लास थंड पाणी प्यावे, तहान लगेच भागते. कोणतेही साखरयुक्त पेय प्यायल्यानंतर पाणी प्यावेसे वाटते, पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. व आहार जितका नैसर्गिक असेल तितकाच आरोग्यादायी असतो.

फळांचा रस : उन्हाळ्यात फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आहारात फळांच्या वापरामुळे जीवनसत्व, क्षार व तंतूमय पदार्थ मिळतात. म्हणून शक्‍यतो फळे खावीत. फळांचा रस हा शीतपेयांना उत्तम पर्याय ठरतो.

लिंबू सरबत : लिंबू सरबतातून क जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळते. त्याचबरोबर जीवनसत्व ब 1, ब 2, ब 3 कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम व मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात मिळते. लिंबामुळे पचनशक्ती सुधारते व यातील “क’ जीवनसत्त्व उत्तम त्वचा प्रदान करते.

हे सरबत घरी बनवून ठेवायचे असल्यास साखरेचा एक तारी पाक बनवावा व पाका इतकाच लिंबू रस त्यात मिसळावा व स्वच्छ बाटलीत भरून ठेवावा. सेवन करताना 1: 3 या प्रमाणात पाणी मिसळावे व वापरावे, याच पद्धतीने तुम्ही आले घालून द्राक्षाचे सरबत बनवू शकता.

शहाळ्याचे पाणी : शहाळ्याचे पाणी हे पाण्याइतकेच नैसर्गिक असते. शहाळ्याच्या पाण्यातून काही प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व व ब 3 जीवनसत्त्व मिळते, घामावाटे बाहेर पडलेल्या क्षारांची कमतरता भरून काढण्यास मदत होते. हे एक ड्युरीटीक आहे व मुतखड्याचा विकार असणाऱ्यांना लाभदायक ठरते.

कोकम सरबत : कोकम हे एक पौष्टिक फळ आहे व नारळाप्रमाणे याच्या सर्व भागांचा वापर करता येतो. या सरबतात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम व फॉस्फरस काही प्रमाणात आढळते. त्याचबरोबर जीवनसत्त्व ब2 व ब3 देखील असते. कोकमसुद्धा ड्युरिटक आहे व हे सरबत शक्‍ती आणि उत्साह वाढवते.

उसाचा रस : उसाचा रस हा देखील शीतपेयांना उत्तम पर्याय आहे. उसाच्या रसात जीवनसत्व व क्षार असतात व रस काढल्यावर त्यात जे आले वापरले जाते त्यामुळे आल्यांचे पौष्टिक घटकदेखील मिळतात. उसाचा रस हा पचनसंस्थेसाठी व यकृतासाठी चांगला असतो. कावीळ झाल्यास उसाचा रस व काकवी यासाठीच दिली जाते.

दूध कोल्ड्रिंक : थंडगार मिल्कशेकची चव व पौष्टिकता दोन्ही चांगली आहे यामधून उच्चप्रतीची प्रथिने, कॅल्शियम, “अ’, ड व ब 12 जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळतात. हे सर्वात पौष्टिक पेय आहे. लहान मुले दूध पिण्याचा कंटाळा करतात. पण दूध कोल्ड्रिंक आवडीने पितात. शक्‍य असल्यास केळ, सफरचंद, आंबा अशा फळांचे तुकडे घालावेत किंवा फ्रूट कोल्ड्रिंक बनवून प्यावे.

लस्सी : लस्सीचा वापरदेखील अधूनमधून करावा. ही पचायला अतिशय हलकी असते व त्यामध्येदेखील काही प्रमाणात प्रथिने, कॅल्शियम व जीवनसत्त्व असतात. बाजारामध्ये इतर फळांची अनेक सरबते उपलब्ध असतात. जसे की आवळा, मॅंगो, कोकम इ. यांचा वापरदेखील करावा पण कोणत्या उत्पादनात खरोखर फळांचा वापर केला गेलेला आहे हे पाहावे.

कारण बऱ्याच उत्पादनात केवळ फळांचा रंग व स्वाद असणारी रसायने वापरलेली असतात. याचा शरीराला काही फायदा होत नाही. याला सिरप म्हणतात. त्यामुळे फ्रूट सिरप न घेता फ्रूट स्क्वॅश व कॉर्डियल इ. वापरावे. पेयाच्या माध्यमातून शरीराला शक्‍ती, स्फूर्ती देणारे बरेच पर्याय आहेत.

फळांचा, फळभाज्यांचा, पालेभाज्यांचा रसाहार आपल्याला खूप आरोग्यदायी ठरतो. म्हणूनच सांगावेसे वाटते की रसपान करा नि निरोगी रहा रसाहार हे एक भाग आपल्या आहारात अवश्‍य असावा. आपणच घराघरातून शीतपेये पिण्यावर बंदी आणावी व त्याला जे पौष्टिक पर्याय आहेत ते वापरावेत.

नैसर्गिक पेयेच शक्‍तिदायी

आजकाल कोलिंड्रक्‍स व तयार ज्यूस पिण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. परंतु संपूर्ण स्वास्थ्यासाठी ही अनैसर्गिक पेये टाळली पाहिजेत. नैसर्गिक पेयांची उपयुक्तता फार पुरातन काळापासून मानण्यात आली आहे. परंतु सध्याच्या फास्टफूडच्या युगात ही पारंपरिक पद्धत विसरली जात आहे. याला कारण यंत्रयुग आणि धावपळीचे जीवन. निसर्गनिर्मित फळांचे व भाज्यांचे ताजे रस हे पचायला सोपे व प्रकृतीवर चांगला परिणाम करणारे असते.

नैसर्गिक पेय शरीर स्वास्थ्याला उपयुक्त व उपकारक ठरतात कारण फळे भाज्या चावण्यासाठी लागणारी शक्ती, यातील महत्त्वाचे घटक शोषून घेण्याची शक्ती व अविशिष्ट मल शरीराबाहेर टाकण्याची शक्ती वाचते. या शक्तीचा उपयोग शरीरात दुसऱ्या गोष्टींसाठी करता येतो. नैसर्गिक रस (पेय) हे ताजे घेतल्याने व्हिटॅमिन्स, खनिज पदार्थ व पाचक द्रव्ये हे घटक पूर्णपणे मिळतात. रस जास्त प्रमाणात घेतला तरी त्याचे दुष्परिणाम काहीच नाहीत.

रस घेण्याची पद्धती

फळे, भाज्या यांचा ताजा रस तयार करताना योग्य ती स्वच्छता बाळगावी. रस हा पचनास हलका आहे. हा रस हळूहळू चमच्याने थोडा थोडा घ्यावा. म्हणजे तोंडापासूनच त्याची पचनाची क्रिया सुरू होते.

डबाबंद पेय आरोग्याला घातक

डबाबंद पेय ही अनैसर्गिक पेय आहेत. यामध्ये खिरी, सूपस, चहा, कॉफी, कोको या सारखी गरम पेय व लिमका, मिरींडा, कोकाकोला, पेप्सी सारखी थंड पेये येतात. हवाबंद डब्यात साठविलेले फळांचे रस चवीला आणि वासाला ताजे वाटत असले तरी त्यातील महत्त्वाचे घटक नष्ट झालेले असतात. तसेच हे रस टिकविण्यासाठी अनेक रसायने वापरलेली असतात ती आरोग्यास घातक असतात. गरम पेयामध्ये चहा, कॉफी, कोकोसारखी उत्तेजक पेय येतात. यामध्ये असलेले टॅनिन हे द्रव्य शरीरावर अनिष्ट परिणाम करते. म्हणूनच अनैसर्गिक पेयांपेक्षा नैसर्गिक पेयच चांगली.

नैसर्गिक पेयांची उपयुक्‍तता

नैसर्गिक पेय म्हणजेच रसाहार. जो पचनास हलका असतो ज्यामध्ये चावणे, पचविणे आणि उत्सर्जन करणे या क्रियांसाठी लागणाऱ्या शक्तींची बचत होते. फळभाज्यांचा रस न काढता चावून खाल्ल्यास फक्त 35 % भाग रक्तात शोषला जातो तर रसाहारामुळे 95% भाग रक्‍तात शोषला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.