शिरूर -करोना लढाईत आपले योगदान देणाऱ्या शिक्षकांना पीपीई किट मिळावे यासाठी पदवीधर शिक्षक संघटनेने शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचेकडे मागणी केली होती. संघटनेच्या मागणीची दखल घेत सर्व शिक्षकांना पीपीई किट अंतर्गत फेस शिल्डचे वाटप केले आहे. शिरूर ग्रामीणच्या शिक्षक कॉलनी येथील साई देवस्थान येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार यांचे हस्ते या फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील उर्वरित शिक्षकांना पदवीधर शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष शहाजी पवार यांचेमार्फत वितरण केले जाणार असल्याचे ऋषीराज पवार यांनी यावेळी सांगितले.
- करोना विरुद्ध सर्व घटकांसमवेत शिक्षकही खांद्याला खांदा लावून लढत आहेत; परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या संरक्षण सुविधा उपलब्ध नव्हत्या. यासाठी आमदार अशोक पवार यांचेकडे पाठपुरावा केल्यावर तत्काळ पीपीई किट अंतर्गत फेस शिल्ड त्यांनी उपलब्ध करून दिले, त्यामुळे विविध ठिकाणी काम करताना शिक्षकांचे संरक्षण होणार आहे.
-शहाजी पवार, शिक्षक पदाधिकारी