केंद्र सरकार 83 फायटर विमानांसाठी 39 हजार कोटी मोजणार
नवी दिल्ली : भारतीय हवाई दल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यामध्ये देशांतर्गत संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा करार झाला आहे. हवाई दल एचएएलकडून सपोर्ट पॅकेजसह 83 सिंगल सीटर तेजस फायटर विमाने विकत घेणार आहे. आधी 83 फायटर विमानांसाठी 56,500 कोटी रुपये मोजावे लागणार होते. पण आता हा संपूर्ण व्यवहार 39 हजार कोटी रुपयांमध्ये अंतिम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्षभरातील चर्चेच्या वेगवेगळया फेऱ्यानंतर ही किंमत 17 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. 83 तेजस मार्क-ए विमानांच्या निर्मितीसाठी एचएएलने सुरुवातीला जी किंमत सांगितली होती, त्याने संरक्षण मंत्रालय आणि इंडियन एअर फोर्सला धक्का बसला होता. आता 39 हजार कोटी रुपयांना अंतिम व्यवहार निश्चित झाला असून, खरेदी संदर्भातील फाईल अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीला पाठवण्यात येणार आहे.
आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे 31 मार्च पूर्वी या फाईलवर मंजुरीची मोहोर उमटणे आवश्यक आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये सर्वप्रथम संरक्षण खरेदी परिषदेने 49, 797 कोटींना 83 तेजस विमानांच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली होती. पण त्यानंतर एचएएलने किंमत वाढवून 53 हजार कोटी केली. सध्या इंडियन एअर फोर्सकडे 30 स्क्वाड्रन्स आहेत. चीन आणि पाकिस्तानचा एकाचवेळी मुकाबला करण्यासाठी 42 स्क्वाड्रन्सची आवश्यकता आहे.
यावर्षी मे महिन्यात पहिली चार राफेल विमाने भारतात दाखल होतील. उर्वरित 32 राफेल फायटर विमाने 2022 पर्यंत टप्याटप्याने भारतीय हवाई दलात दाखल होतील. आयएएफच्या सुलूर येथील फ्लाईंग डॅगर्स स्क्वाड्रनला आतापर्यंत 40 पैकी 16 तेजस मार्क-1 फायटर विमाने मिळाली आहेत.