फलटण तालुक्‍याचे भविष्य सुरक्षित ठेवा : रामराजे

फलटण – फलटण तालुक्‍याचे भविष्य सुरक्षित व दहशहतमुक्‍त ठेवायचे असेल तर नालायक लोकांच्या हातात सत्ता देऊ नका, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आ. दीपक चव्हाण यांच्या प्रचारासाठी विडणी, ता. फलटण येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

बाजार समितीचे सभापती रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, सरपंच रूपाली अभंग, पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्‍मा भोसले, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, आगवणे यांनी चंदनाचे तेल व लाकडाचा उद्योग करावा. ज्याच्या संगतीत राहतो त्याचा वाण ना गुण लागतो. फलटणमध्ये सध्या असे वातावरण आहे, आगवणे यांचा पराभव निश्‍चित असून खासदार गटाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून निश्‍चिंत राहायला सांगितले आहे.

साडेतीनशे कोटींची दूध डेअरी विकली, त्याचे पैसे कुठे गेले?आता उपळवेचा साखर कारखानादेखील जाण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे फलटणचा विजय मल्ल्या कोण, हे जनतेने निश्‍चित करावे. गेली दहा वर्षे फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. चव्हाण यांचा कारभार पारदर्शक आहे. त्यांच्यावर आतापर्यंत एकही डाग नाही. ते निष्कलंक असल्याने त्यांना तिसऱ्यांदा सर्वानुमते उमेदवारी दिली आहे. त्यांना भरघोस मताधिक्‍याने निवडून द्या.

माढ्याचा खासदार नुरा कुस्तीवर विजयी झाला असून विरोधकांनी फलटणमध्ये नीचपणाचा कळस गाठला आहे; आमच्या रक्तात नीचपणा नाही. राजकारण जरूर करावे; परंतु त्या पायी एखाद्याच्या प्रपंचाची राखरांगोळी करू नये. असे प्रतिपादन रघुनाथराजे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.