वॉशिंग्टन – बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल अमेरिकेने दु:ख व्यक्त केले आहे. गेल्या मंगळवारी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शर्मन यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारला हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यास सांगितले होते. शर्मन यांनी बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद आणि संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांच्याकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत चौकशीची मागणी केली.
शर्मन यांनी सध्याच्या अमेरिकन प्रशासनाला हिंदू समुदायाविरोधातील हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्याची आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. गेल्या महिन्यात चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोह आणि बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर भगवा फडकवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
त्यांच्या अटकेनंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली. चिन्मय कृष्ण दास यांच्यावर हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत स्थानिक राजकारण्याने तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
चिन्मय कृष्ण दास यांनी त्यांच्या अटकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यासाठी पुढील सुनावणीची तारीख 2 जानेवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, देशद्रोहाच्या आरोपाखाली ते तुरुंगातच राहणार आहेत. बचाव पक्षाचे वकील न्यायालयात गैरहजर राहिल्याने चट्टोग्राम महानगर सत्र न्यायाधीश सैफुल इस्लाम यांनी सुनावणीसाठी नवीन तारीख निश्चित केली. चिन्मय यांची केस लढणारे वकील रमन राय यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. ते सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांच्यावर कट्टरतावाद्यांनी हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
बांगलादेशचा भारतावर निशाणा
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील माहिती आणि प्रसारण सल्लागार नाहिद इस्लाम यांनी भारतावर निशाणा साधला असून भारत बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करून प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
नाहिद इस्लाम हा बांगलादेशच्या विद्यार्थी चळवळीचा प्रमुख चेहरा आहे. त्याच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळेच ५ ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकण्यात आले होते.
मात्र शेख हसीना यांचे सरकार पडून तीन महिने उलटले तरी बांगलादेशातील परिस्थिती सामान्य झालेली नाही. तर मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात देशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदू समाजाच्या लोकांवर खूप अत्याचार झाले आणि बांगलादेशात अजूनही ही परिस्थिती कायम आहे. यासंदर्भात भारताने बांगलादेशच्या अंतरिम सरकारला देशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले होते.
नाहीद इस्लामची भारताविरूध्द पोस्ट
बांगलादेशविरोधी आणि मुस्लिमविरोधी विधानांना प्रोत्साहन देणे शेवटी भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात काम करेल. भारताचा शासक वर्ग फुटीरतावादी राजकारण आणि बांगलादेशविरोधी विधानांत गुंतलेला आहे. बांगलादेशचे पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम यांच्याशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, ते आमचे भागधारक आहेत.
नाहिदने आपल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की, बांगलादेशातील बंडाच्या वेळी पश्चिम बंगाल आणि दिल्लीचे विद्यार्थी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अत्याचाराचा निषेधही केला. भारतातील हिंदुत्ववादी सरकारला असे लोकशाही संबंध आणि सौहार्द नको आहे असे नाहिद इस्लामने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.