“हेरिटेज’चे रक्षणही “एनडीआरएफ’च्या खांद्यावर

– गायत्री वाजपेयी

पुणे – नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीदरम्यान राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान आता ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळ, स्मारक यांचाही बचाव करणार आहेत. आपत्ती काळात “हेरिटेज’ वास्तूंचा बचाव करण्यासाठी विशेष तुकडी तयार केली जाणार असून, लवकरच या जवानांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भूकंप, पूर, त्सुनामी, आग लागणे यासारख्या आपत्तींदरम्यान मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते. अशावेळी जास्तीत जास्त लोकांचा बचाव करून कमीत कमी जीवितहानी होईल, यासाठी “एनडीआरएफ’चे जवान प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नांना चांगले यश मिळते. मात्र या आपत्तीदरम्यान होणाऱ्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे नुकसान टाळणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. उत्तराखंड येथील पुरात वाहून गेलेले प्राचीन शिवमंदिर, नेपाळमधील भूकंपात नुकसान झालेली वारसास्थळे, तसेच आगीमध्ये भस्म झालेले राजवाडे, ऐतिहासिक इमारती अशी विविध उदाहरणे आहेत. या पुरातन वास्तूंचे जतन करण्याच्या दृष्टीने “युनेस्को’ या जागतिक संस्थेने आपत्तीकाळात या वास्तूंच्या बचावासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व राष्ट्रांना केले होते. त्यानुसार देशात आता “एनडीआरएफ’ची विशेष तुकडी तयार केली जाणार असून, प्रत्येक बटालियनअंतर्गत ही तुकडी कार्यरत राहील.

पुरी येथे सादर होणार प्रायोगिक प्रात्यक्षिके
आपत्ती व्यवस्थापनात पुरातन वास्तूंची काळजी या विषयावरील प्रात्यक्षिकांचे प्रायोगिक सादरीकरण लवकरच पुरी (ओरिसा) येथे होणार आहे. यामध्ये “बिम्सटेक’ म्हणजेच बंगालच्या उपसागर परिसरातील स्वतंत्र राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, या संरक्षण कामाला प्रत्यक्षात कसे करायचे, याबाबतचा अभ्यासदेखील या सरावादरम्यान केला जाणार आहे. साधारणत: फेब्रुवारीत हा सराव होण्याची शक्‍यता आहे.

या विशेष तुकडीची नेमकी भूमिका आणि कार्य याबाबत “एनडीआरएफ’कडून नियोजन सुरू आहे. यामध्ये पुरातन सर्वेक्षण विभागाचीदेखील मदत घेतली जाईल. आपत्ती काळात पुरातन वास्तूंना कशाप्रकारे हाताळावे, हे यामागील प्रमुख उद्दिष्ट असून, लवकरच यासंदर्भातील सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.’
– कमांडंट पंडित इथापे, संचालक, एनडीआरएफ पाचवी बटालियन.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)