पिरंगुट (पुणे) – भूगाव येथे एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पौड पोलिसांनी छापा टाकला. यामधून एका मुलीची सुटका करण्यात आली असून, दोघांना अटक केली आहे. या घटनेत अनिकेत रामदास पवार (वय 23, रा. पिरंगुट) आणि प्रदीप मारुती खराडे (वय 24) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूगाव येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, महिला पोलिस उपनिरीक्षक रेखा दुधभाते, पोलिस कॉन्स्टेबल मयुर निंबाळकर, पोलिस शिपाई गणेश साळुंके, पोलिस शिपाई नामदेव मोरे यांनी सदर ठिकाणी सापळा लावला आणि आरोपींच्या हालचालींचे निरीक्षण करून येथील सोसायटीमधील फ्लॅटमध्ये जाऊन छापा घातला असता तेथे वेश्या व्यवसाय चालू असल्याचे निदर्शनास आले.
येथून एका मुलीची सुटका केली आहे. आरोपी हे मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडून स्वतःची उपजीविका करत होते. पौड भागात अशा प्रकारचे व्यवसाय चालू असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी यावेळी सांगितले.