पुणे: शहरात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे अवैध धंदे मात्र सुरूच आहेत. बाणेरमधील उच्चभ्रू भागात रो हाउसमध्ये महिलांना ठेवून त्यांच्याकडून हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी मंगळवारी रो हाउसवर छापा टाकून चार महिलांची सुटका केली तसेच वेश्याव्यवसाय चालक महिला आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
सुरेश प्रल्हाद रणवीर ( रा. बाणेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणेर भागातील धनकुडे वस्तीमध्ये पाषाण टेकडीलगत एका रो हाउस मध्ये महिलाकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे अशी माहिती चतु:श्रृंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे, राजेंद्र दहिफळे, सतिश चव्हाण, अरूण साबळे, रूपाली भरेकर, स्मिता महाजन आदींच्या पथकाने रात्रीच्या सुमारास रो हाउसवर छापा टाकला तसेच वेश्याव्यवसाय चालविणारी महिला आणि व्यवस्थापक सुरेश रणवीर यांना ताब्यात घेतले तसेच चार महिलांची सुटका केली.
दोघांनी जादा पैशाचे आमिष दाखवून रो हाउसमध्ये ठेवले होते तसेच त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. सुटका केलेल्या महिलांना मुंढव्यातील रेस्क्यू फाउंडेशन या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.