नियुक्‍तीपत्रांसाठी भावी शिक्षक ठाम

अन्यथा पुन्हा आंदोलन : उमेदवारांचा इशारा

पुणे – पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीतील उच्च माध्यमिक शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण करुन दि.30 नोव्हेंबरपर्यंत नियुक्त पत्र देण्यात यावे, अन्यथा उपोषण आंदोलन पुन्हा सुरु करण्यात येईल, असा इशारा शिक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवारांकडून शिक्षण विभागाला देण्यात आलेला आहे.

शिक्षक भरतीच्या सूचना पोर्टलवर पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या सूचनांमुळे काही उमेदवारांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 9वी ते 12वीच्या शिक्षक भरतीसाठी निवड यादी प्रसिद्ध झाली होती. कागदपत्रांचीही पडताळणीही करण्यात आलेली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ती उठवण्यात आली.

भरती प्रक्रियेतील इतर विविध प्रश्‍नांसदर्भात चर्चा करण्यासाठी उमेदवारांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची पुन्हा भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणी मांडली आहेत. “भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना संधी द्या. अन्याय करू नका. त्वरीत नियुक्तीे द्या,’ अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

शिक्षण आयुक्तांनी उमेदवारांच्या सर्व तक्रारी जाणून घेतल्या आहेत. त्यावर समाधानकारक उत्तरेही दिली आहेत. शासनाच्या धोरणानुसारच भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे. काही धोरणात आवश्‍यक ते बदलही शासन पातळीवर करावे लागणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.