हितचिंतकांचा जाच?

छोट्या पडद्यावर मोहित रैना काम करतो. देवों के देव महादेवमधील भूमिकेमुळे त्याला विशेष प्रसिद्ध मिळाली. त्याचा चेहरा चांगला परिचित झाला. आता अचानक सोशल मीडियावर मोहित को बचाव कॅंपेन सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.

कोणाला तरी वाचवा असे मेसेजेस जेव्हा कोणी टाकते तेव्हा ते त्या व्यक्‍तीचे हितचिंतक असतात. आपल्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे काही वाईट घडू नये असे त्यांना वाटत असते. त्यामुळे ते असला पुढाकार घेतात.

मात्र, हा प्रकार समोर आल्यावर मोहितने थेट बॉम्बे हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि कोर्टाच्या निर्देशानुसार चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे ते त्याचे मित्र आणि मैत्रिणी आहेत हे विशेष. त्यात अभिनेत्री सारा शर्मा, परवीन शर्मा, आशिव शर्मा आणि मिथिलेश तिवारी यांचा समावेश आहे.

सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहितच्या जीवाला धोका असल्याची अफवा पसरवल्याचा, तसेच खंडणी मागितल्याचा आणि पोलिसांना चुकीची माहिती दिल्याच्या यांच्यावर आरोप आहे. मोहितच्या कुटुंबीयांनी या सगळ्याला आक्षेप घेतला आहे.

मात्र, मोहितच्या जीवाला धोका आहे आणि तो सुशांतप्रमाणे आत्महत्या करू शकतो. त्यामुळे त्याला वाचवण्याची गरज असल्याचे संबंधित कॅम्पेनमध्ये म्हटले होते. पोलिसांना हे गुन्हेगारी कारस्थान वाटते आहे. ते त्यांच्या पद्धतीने तपास करतील.

मात्र, पोलिसांनी या कॅम्पेनची ही दुसरी बाजूही समजून घ्यावी अशी कोणाचीही अपेक्षा असू शकते. सुशांत प्रकरणात त्याचा कोणी गळा दाबून किंवा गोळी घालून खून केल्याचे किमान अद्याप तरी सिद्ध झालेले नाही.

एखाद्याला मारण्यासाठी त्याला मारायलाच हवे असे नाही तर त्याने स्वत:च टोकाचे पाऊल उचलावे अशा परिस्थितीपर्यंत त्याला आणून ठेवणे हाही हत्येचाच एक भाग असू शकतो. मोहितच्या संबंधित हितचिंतकांना असे काही निदर्शनास आले होते का,

त्यांना अशी भीती का वाटते आहे व मुळात ते हितचिंतकच आहेत हे सगळे प्रश्‍न या प्रकारात निर्माण झाले असते. पण एक मात्र खरे, यांना काही गुन्हेगारी कट करायचा असता तर ते सोशल मीडियावर गेले नसते व त्यांनी जाहीर वाच्यताही केली नसती, असे म्हणता येऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.