आयत्यावेळी समितीने मंजूर केलेले प्रस्ताव

विषय पत्रिकेवर अवघे साडेसात कोटी
323 कोटींचे 80 प्रस्ताव मागील दाराने मंजूर

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या धास्तीने स्थायी समितीने सभांचा सपाटा लावला आहे. मागील दोन आठवड्यात एकूण सहा सभा पार पडल्या. त्यात तीन विशेष सभांचा समावेश होता. या सभांमध्ये सुमारे साडेआठशे कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. साप्ताहिक सभांना आयत्यावेळच्या प्रस्तावाद्वारे कोट्यावधी खर्चाचे प्रस्ताव मागील दाराने मंजूर करण्यात आले.

पिंपरी – आयत्या वेळेच्या प्रस्तावाद्वारे कोट्यवधी खर्चाच्या मंजुरीचा रतीब लावलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आज (बुधवारी) अक्षरशः “धुराळा’ केला. विषय पत्रिकेवरील सुमारे साडेसात कोटी रुपये खर्चाचे मूळ प्रस्ताव मंजूर करताना आयत्यावेळचे तब्बल 323 कोटी 32 लाख रुपये खर्चाचे 80 प्रस्ताव मंजूर केले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची भलतीच धास्ती घेत स्थायी समितीने केलेल्या या “विक्रमा’ची उलट-सुलट चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पावसाळ्यापूर्वी आवश्‍यक असणाऱ्या देखभाल, दुरुस्ती, नालेसफाईच्या निविदा अडकल्या होत्या. यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास उशीर झाला होता. आता पुन्हा ऑक्‍टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून येत्या दोन दिवसात आचारसंहिता सुरू होण्याची अटकळ बांधली जात आहे. यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच आवश्‍यक कामांना मंजुरी देत ही कामे पुढील महिना-दोन महिन्यांच्या कालावधीत रखडू नयेत, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू आहे. यंदाच्या पालिकेच्या अंदाजपत्रकात विकासकामासाठी निधीची तजवीज करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात विकास कामांना निधीची मंजुरी घेणे आवश्‍यक आहे. आचारसंहितेची धास्ती असल्याने कामांचे प्रस्ताव मंजूर करून घेण्याची धावा-धाव दोन आठवड्यापासून सुरू आहे.

चुकून आला प्रस्ताव?
स्थायी समितीच्या सभेपुढे विषय पत्रिकेवरील 28 मूळ प्रस्ताव मंजुरीसाठी होते. त्यापैकी कमी महत्त्वाचे आणि कमी खर्चाचे असलेले 14 प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब ठेवले. महापालिकेच्या व्यायामशाळा चालविण्यास देण्याचे 13 प्रस्ताव दोन महिन्यांसाठी तहकूब ठेवण्यात आले. बालवाड्यांचे थ्रीडी पेंटींग करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने यापूर्वी दोनदा तहकूब ठेवला होता. अखेर हा प्रस्ताव प्रशासनाने आज मागे घेतला. शहरातील पूरबाधित झोपडपट्टीवासियांना चादर, ब्लॅंकेट देण्याचा प्रस्ताव अडीच महिन्यांसाठी तहकूब ठेवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण समितीमार्फत हा विषय आणण्यात आला होता. विषय समित्यांकडून आलेले सर्व प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आल्याने या समित्यांची गोची झाली आहे. भोसरी येथे नव्याने उभारण्यात आलेले रुग्णालय व पिंपरीतील जिजामाता रुग्णालयासाठी मेडिकल गॅस पाईप लाईनच्या कामासाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, हा प्रस्ताव चुकीने आल्याचे सांगत प्रशासनाने स्वतःहून हा विषय मागे घेतला.

अवघ्या दोन आठवड्यांत तब्बल 850 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर

पवना नदीच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकणे – 96 कोटी 81 लाख
इंद्रायणी नदीच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकणे – 47 कोटी 62 लाख
भोसरी उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रिटनुसार विकास – 31 कोटी 3 लाख
पिंपळे गुरव प्रभागात रस्ते कॉंक्रीटीकरण – 23 कोटी 85 लाख
चिखली प्रभागातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण – 5 कोटी 83 लाख
चिखलीतील सावतामाळी उद्यानात व्यायामशाळा – 3 कोटी 32 लाख
शहरातील श्‍वान संतती नियम शस्त्रक्रिया – 2 कोटी 92 लाख
प्रभाग क्रमांक 26 मध्ये सिमेंट कॉंक्रीटीकरण – 2 कोटी 9 लाख

Leave A Reply

Your email address will not be published.