देहूगाव – देहू नगरपंचायत हद्दीतील नवीन बांधकाम नोंदीनां शास्ती कर आकारणी करण्याचा प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती घेत विशेष सभा घेऊन निर्णय घेण्याचा प्रस्ताव करण्यात आला. देहू नगरपंचायतीचे सर्व साधारण सभा नुकतीच पार पडली. नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, बांधकाम समिती सभापती योगेश काळोखे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्यासह विविध समित्यांचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते.
तत्कालीन देहू ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात देहूत अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. नगरपंचायत हद्दीतील बांधकामाच्या नोंदी करताना बेकायदेशीर ,अनधिकृत बांधकामांना शास्तीकर आकारणी संदर्भात तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील आळंदी नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत शास्तीकर आकारला जात आहे की नाही, याची माहिती मागविण्यात आली आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर देहू नगरपंचायतीच्या हद्दीत शास्तीकर लागू करण्याबाबतचे धोरण ठरविले जाणार आहे. त्याकरिता विशेष सभेचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
नगरपंचायतींशी संबंधित अनेक बाबी न्यायालयात प्रलंबित असल्याने हे कामकाज हाताळण्यासाठी वकीलाची नियुक्ती करणे गरजेचे आहे. न्यायालययीन सुनावणीदरम्यान हा वकील नगरपंचायतीची बाजी प्रभावीपणे मांडू शकतो.त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी वकीलाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
याशिवाय स्थापत्य कनिष्ठ अभियंता मानधन तत्वावर नेमणूक करणे, हद्दीतील स्ट्रीटलाईट, हायमास्टबसविणे, कंत्राटी पद्धतीने देखभाल दुरुस्तीसाठी पथदिव्यांची काम देणे, नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत विविध कामे करणे, जलउपसा केंद्रावरील नवीन पंप व मोटर खरेदी व देखभाल दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आले. परिसरात सीएसआरएस निधीतून उभारण्यात आलेल्या आरो फिल्टर ताब्यात घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच परिसरात सुमारे 45 पाण्याच्या एटीएम असून त्यांना पाण्याचे दर (5 रूपयांत 20 लिटर ) निश्चित करून कर आकारणी करणे तसेच नगरपंचायतीच्या वतीने महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आले. दलितत्तोतपर व नगरोत्थान निधीतून विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात सुमारे 18 कोटी निधीची प्रस्ताव मांडण्यात आले.
अंत्यसंस्कारासाठी परवानगी पास बंधनकारक
देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील अंत्यसंस्कारांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या परवानगी पासाची गरज नव्हती. मात्र, आता पुढीलकाळात मृतदेहावर अंत्यसंस्कार करावयाचा झाल्यास, त्याकरिता नगरपंचायतीच्या परवानगी पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात देहूतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी परवानगी पास आवश्यक असणार आहे.