पीएमपीला साडेसात कोटी देण्याचा प्रस्ताव स्थायीत

मुख्यमंत्र्यांच्या मेसेजनंतर महापौरांची माघार

पिंपरी-चिंचवड शहराला पुरेशा प्रमाणात सुस्थितीतील बस पुरविल्या जात नसल्याने जानेवारी महिन्यात महापौर राहुल जाधव यांनी पीएमपीएमएलला निधी देणार नसल्याची भूमिका घेतली होती. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजताच त्यांनी महापौर जाधव यांना मेसेज करत, सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पीएमपीएमएलची रसद पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पीएमपीएमएलला साडे सात कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. त्यापैकी सहा कोटी रुपये संचलन तुटीपोटी तर सवलतीच्या पासांच्या मोबदल्यात दीड कोटी अशी एकूण साडे सात कोटी रक्कम दिली जाणार आहे.

पीएमपीएमएलमध्ये पुणे महापालिकेचा 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 40 टक्के हिस्सा आहे. त्यानुसार सर्व खर्चाची 60-40 या प्रमाणात विभागणी केली जाते. त्यामुळे महापालिकेच्या सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात पीएमपीएमएल या लेखाशिर्षावर 190 कोटी 82 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये संचलन तुटीपोटी 97 कोटी 82 लाख रुपये, सवलतींच्या पासापोटी 18 कोटी तर बस खरेदीसाठी 75 कोटी रुपये असे खर्चाचे वर्गीकरण केले आहे. बस संचलन तूट आणि सवलतीच्या पास खरेदीसाठी एकूण साडे सात कोटी रुपये जुलै महिन्यात देण्याचे प्रस्तावित आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.