नगर – विनाअनुदानित उच्च माध्यमिक व माध्यमिक, तसेच अनुदानित शाळांतील विनाअनुदानित वर्गांवर काम करणाऱ्या शिक्षकांना सरकारने 20 टक्के अनुदान जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 92 शाळांकडून प्रस्ताव दाखल झालेले आहे. या दाखल प्रस्तावांची वेतनपथाकडून पडताळणी सुरु आहे. विनाअनुदानित शाळांवर वेतन मिळेल, या आशेने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक काम करीत आहेत. 1999 ते 2000च्या अगोदर शाळांना 20 टक्के अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर अनुदान बंद केले होते.
अनुदान मिळेल, या आशेवर शिक्षक आजपर्यंत कार्यरत होते. या विनाअनुदानित शाळांना आता 20 टक्के अनुदान जाहीर केले आहे. तसा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. मात्र, हे अनुदान 2013-14मध्ये मूल्यांकन झालेल्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांना, तसेच अनुदानित शाळांच्या विनाअनुदानित तुकड्यांना मिळणार आहे. त्यासाठी शिक्षण संचालनालयाने, उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांनी तत्काळ आपले प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करावेत, असे त्या अध्यादेशात म्हटले आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील विनाअनुदानित व विनाअनुदानित असलेल्या तुकड्यांचे प्रस्ताव तयार करून ते जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडे दाखल करण्यात आलेले आहे. एकूण 92 प्रस्ताव शिक्षण विभागाला दाखल झालेले असून त्यांची पडताळणी शिक्षण विभागाने करून ते वेतनपथाकडे पुढील पडताळणीसाठी पाठविलेले आहे. वेतनपथाकडून या प्रस्तावांची तपासणी सुरु आहे. ही वेतनपडताळणी झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षण उपसंचालकांना दाखल करण्यात येणार आहे.