कराड तालुक्यातील वाघेश्वर, खोडशी, तुळसण, पेंबर व कोळे जिल्हा परिषद शाळेचा समावेश
कराड – राज्यातील 21 जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येणार असून यामध्ये कराड तालुक्यातील वाघेश्वर, खोडशी, तुळसण, पेंबर व कोळे या पाच शाळांचा समावेश झाला असल्याची माहिती पंचायत समितीच्या मासिक सभेत देण्यात आली.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभारावर सभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. ते सभेला येत नसतील तर पुढील सभा त्यांच्या कार्यालयात घेऊ असा पवित्रा सदस्यांनी घेतला. अध्यक्षस्थानी सभापती फरिदा इनामदार होत्या. यावेळी उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची उपस्थिती होती.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा आढावा उपअभियंता सुनील आडके यांनी दिला. तालुक्यात काही गावात पाणी टंचाई आहे. मात्र ज्या- ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेथे आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. टाळगाव अंतर्गत येणाऱ्या शेवाळवाडी येथे दोन बोअर आहेत. त्याला पाणी उपलब्ध आहे. पिण्याचे पाणी आठ दिवसातून दोन वेळ मिळत आहे.दक्षिण मांड नदीला पाणी आल्याने नदीकाठावरील टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्न मिटला असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्य ऍड. शरद पोळ यांनी टंचाईग्रस्त गावांना टॅंकरव्दारे केला जाणारा पाणीपुरवठा अपुऱ्या स्वरूपाचा होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती मिळत नाही. अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नाहीत. पत्र देवूनही ते मासिक सभेस उपस्थित रहात नसतील तर पुढची सभा आपण त्यांच्या कार्यालयात घेऊ अशा शब्दात पोळ यांनी संताप व्यक्त केला. शिक्षण विभागाचा आढावा गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत निकम यांनी दिला. शौचालय नसणाऱ्या जि.प. शाळांची माहिती वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर या शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा गणवेश एकाच रंगाचा असावा असे डॉ. आबासाहेब पवार यांनी सूचविले.
सीबीएसईच्या नावाखाली अनावश्यक अभ्यासक्रम व भरमसाठ फी पालकांकडून आकारली जात असल्याने संबंधित शाळांची चौकशी करावी, अशी मागणी सुरेखा पाटील यांनी केली.एकात्मिक बालविकास विभागाच्या आढावा दरम्यान पर्यवेक्षिका नंदिनी घोरपडे यांनी जिल्हा परिषद शाळांप्रमाणे तालुक्यातील अंगणवाडी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आल्याचे सांगितले. त्याबाबतचे प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना देण्यात येत असून आकार हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगत त्याला पालकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. सभेत वैशाली वाघमारे, बाळासो निकम, रमेश चव्हाण, काशिनाथ करांडे, नामदेव पाटील यांनी भागातील प्रश्न उपस्थित केले. सभेत कृषी, बांधकाम, पाटबंधारे, ग्रामपंचायत, आरोग्य, वीज कंपनी आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.
राज्यातील 21 शाळांमध्ये समावेश
विस्तार अधिकारी आनंद पळसे यांनी वाबळेवाडी ता. शिरूर जि. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय शाळेचा पाहणी दौरा 80 जणांच्या पथकाने नुकताच केला असल्याचे सांगितले. त्या धर्तीवर या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील 21 जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचे सरकारचे धोरण असून यामध्ये कराड तालुक्यातील पाच शाळांचा समावेश झाला असल्याचे ते म्हणाले. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये महाराष्ट्र शासनाने तयार केलेला नवीन अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. याशिवाय सर्व भौतिक सुविधांची उपलब्धता लोकसहभाग व सीएसआरच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे पळसे यांनी यावेळी सांगितले.