पाथर्डी(प्रतिनिधी) -शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ शेवगाव रस्त्यावर दिवसाढवळ्या तीन चोरट्यांनी बळजबरीने मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराने सांगितलेल्या वर्णनावरून दुसऱ्याच दिवशी तिघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ शेवगाव रस्त्यावर राहुल सुनील ठोंबरे हा युवक बुधवारी (दि. 27) दुपारी मोबाईलवर बोलत असताना चोरट्यांनी फोडलेल्या बाटलीचा धाक दाखवून हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला.
तालुक्यातील खर्डे येथील राहुल सुनील ठोंबरे हा युवक पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस आहे. करोना साथरोगामुळे ठोंबरे कुटुंबीय आपल्या मूळ गावी आलेले आहे. बुधवारी राहुल कामानिमित्त पाथर्डी शहरात आला होता. शहरातील शेवगाव रस्त्यावर मोबाईलवर बोलत असताना तीन चोरट्यांनी त्याचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन पळ काढला. या घटनेनंतर ठोंबरे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुरुवारी (दि.28) पोलिसांना या घटनेतील आरोपींची माहिती मिळाली. पोलीस पथकाने आरोपी कानिफ सुभाष हाके (रा. हाकेवाडी, ता. पाथर्डी), रवींद्र नवनाथ जाधव (रा. पांगरा, ता. आष्टी, हल्ली रा. नाथनगर, पाथर्डी), संतोष सूर्यभान धोत्रे (रा. नाथनगर, ता. पाथर्डी) यांना शहरातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मोबाईलही दिला.