इस्लामपुरात मालमत्ताधारकांच्या संकलीत करात सवलत

विनोद मोहिते : इस्लामपूर

शहरातील मालमत्ताधारकांना संकलीत करात सवलत जाहीर करण्यात आली आहे. झोन क्रमांक एक व दोनसाठी ५५ टक्के तर तीन व चारसाठी ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय तीन विरुद्ध चार मतांनी झाला आहे. वाणिज्य घटकासाठी गतवर्षी दिलेल्या सवलतीत पाच टक्के वाढवून देत ५० टक्के सवलत जाहीर करण्यात असल्याची माहिती नगराध्यक्ष निशिकांत पाटील व राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी दिली.

अपील समितीच्या सदस्य जयश्री माळी उपस्थित होत्या.वाढीव मालमत्ता कराच्या मुद्यावर गेले तीन दिवस चाललेल्या सुनावणी प्रक्रियेनंतर हा निर्णय झाला. शहरातील १६ हजारहून अधिक मालमत्ता धारकांनी पालिका प्रशासनाकडे अपील दाखल केले होते. त्यावर गेले तीन दिवस सुनावणी झाली. दोन शासकीय सदस्य वगळता इतर तिघांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसू नये याचा विचार करून सवलत दिली जावी अशी ठाम भूमिका समितीसमोर मांडली. त्यानुसार हा सवलतीचा निर्णय झाला.

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, “इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अपिले दाखल झाली. नागरिकांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करून व्यापक जनहितार्थ त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पालिकेचेही नुकसान होऊ नये असा प्रयत्न आहे. उपयोगकर्ता कर आणि बेकायदेशीर बांधकाम केल्याने लावण्यात आलेली शास्ती यावर उद्याच्या सर्वसाधारण सभेत सकारात्मक चर्चा होईल.आमच्यावर जाणीवपूर्वक मालमत्ता कर वाढवल्याचा आरोप काहींनी केला होता. त्यावर आज आम्ही घेतलेला सवलतीचा निर्णय हे चोख उत्तर ठरेल.”

गटनेते कोरे म्हणाले, “कोरोना संसर्गामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्याचा विचार आम्ही केला आहे. वाणिज्य घटकाला मदतीची मोठी गरज होती. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के जादा सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरातील नागरिकांवर कराचा बोजा पडू न देण्याच्या सूचना केल्या होत्या, त्याचा पाठपुरावा केला आहे.”

झोननिहाय लाभ मिळणारे मालमत्ताधारक असे –
झोन १ : ४४७१
झोन २ : १०६७६
झोन ३ : ५६३३
झोन ४ : १६७८
शहरात सध्या एकूण २२ हजार ४९९ मालमत्ताधारक आहेत. वाणिज्य घटकासाठी गतवर्षी दिलेल्या सवलतीत पाच टक्के वाढवून देत ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.